ग्रीस-तुर्की तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्रमंत्री ग्रीसला भेट देणार

- तुर्कीतील अमेरिकी तळ ग्रीसमध्ये हलविण्याचे संकेत

वॉशिंग्टन/अथेन्स – भूमध्य सागरी क्षेत्रातील अधिकारांवरून ग्रीस व तुर्कीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ ग्रीसचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ ग्रीसच्या क्रेटे बेटावरील अमेरिकी संरक्षणतळालाही भेट देणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच अमेरिका व ग्रीसच्या संरक्षणदलांमध्ये संयुक्त लष्करी सराव पार पडला होता. त्यापाठोपाठ परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा आयोजित करून ग्रीस-तुर्की वादात, आपण ग्रीसच्या पाठीशी असल्याचा संदेश अमेरिकेने दिल्याचे मानले जाते. या ग्रीस दौऱ्यात पॉम्पिओ तुर्कीतील ‘इन्सिर्लिक बेस’ ग्रीसमध्ये हलविण्याबाबत चर्चा करतील, असे संकेत देण्यात येत आहेत.

परराष्ट्रमंत्री

गेल्या महिन्यात, तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचवणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात, असा इशारा ग्रीसने दिला होता. अमेरिकेसह युरोपीय महासंघ व नाटोनेही तुर्कीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली होती. तुर्कीच्या कारवायांमुळे तणाव वाढल्याने फ्रान्सने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करून फ्रान्सने ‘ला फाएत’ ही विनाशिका व रफायल विमाने तैनात केली होती. मात्र तुर्कीचे आपली मोहीम चालूच ठेवल्याने या क्षेत्रातील तणाव चांगलाच चिघळला होता.

परराष्ट्रमंत्रीअमेरिका व युरोपिय महासंघाने या वादात ग्रीसचे समर्थन करीत तुर्कीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. या दबावामुळे तुर्कीने आपले जहाज भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेऊन ग्रीसबरोबर चर्चेस सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतरही अमेरिकेने तुर्कीवरील दडपण कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्या ग्रीस दौऱ्यावरून दिसून येते. ‘भूमध्य सागरातील शांतता व सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असून पॉम्पिओ यांचा दौरा त्याला नवी गती देणारा ठरेल. अमेरिका व ग्रीसमधील संबंध गेल्या काही वर्षांत अत्यंत मजबूत झाले आहेत. ग्रीस हा अमेरिकेचा नाटोतील महत्वाचा भागीदार देश असून क्रेटे वरील संरक्षणतळाला देण्यात येणारी भेट या भागीदारीचे प्रतीक आहे’,असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

परराष्ट्रमंत्री

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील सिनेटर रॉन जॉन्सन यांनी एका मुलाखतीत, अमेरिका तुर्कीतील ‘इन्सिर्लिक एअर बेस’ला पर्याय शोधत असल्याचा दावा केला होता. अमेरिकेला तुर्कीबरोबर सहकार्य कायम ठेवायचे असले तरी द्विपक्षीय पातळीवरील तणावामुळे संरक्षणतळाबाबत फेरविचार करावा लागू शकतो, असे सिनेटर जॉन्सन यांनी सांगितले होते. त्याचवेळी पर्याय म्हणून ग्रीसचा विचार सुरू केल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांकडून ग्रीसमधील संरक्षणतळाला देण्यात येणारी भेट तुर्कीला थेट इशारा असल्याचे मानले जाते.

leave a reply