अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून टिकटॉक व वुईचॅट या चिनी ॲप्सवर निर्बंधांची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक व वुईचॅट या प्रमुख चिनी ॲप्सवर निर्बंधांची घोषणा केली आहे. गुरुवारी रात्री दोन स्वतंत्र वटहुकूम जारी करुन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, या दोन्ही चिनी ॲप्सना ४५ दिवसांची मुदत देण्यात येत असल्याचे जाहीर केले. बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेट क्षेत्रातील चीनच्या प्रभावाला धक्का देण्यासाठी ‘क्लीन नेटवर्क प्रोग्राम’ची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जारी केलेले वटहुकूम चीनला बसलेला दुसरा मोठा हादरा ठरला आहे.

trump-restrictionsदोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनविरोधात व्यापारयुद्धाची घोषणा केली होती. व्यापारयुद्धाअंतर्गत ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व इंटरनेट क्षेत्रातील चिनी कंपन्यांच्या वर्चस्वाविरोधात कारवाईही सुरू केली होती. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट या कंपन्यांच्या माध्यमातून हेरगिरी, बौध्दिक संपदेची चोरी, खोट्या माहितीचा प्रसार तसेच आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ट्रम्प यांनी या मुद्द्यावर ‘इमर्जन्सी’ही जाहीर केली होती. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनविरोधात कारवाईची तीव्रता अधिकच वाढविल्याचे दिसत आहे.

टिकटॉक व वुईचॅट या चिनी ॲप्सची मालकी असणाऱ्या ‘बाईटडान्स’ तसेच ‘टेंसेन्ट’ या चिनी कंपन्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला अमेरिकी जनतेची खाजगी माहिती पुरवीत असल्याचा दावा ट्रम्प यांनी आपल्या वटहुकूमांमध्ये केला. या माहितीचा वापर ब्लॅकमेल तसेच हेरगिरीसाठी होऊ शकतो असे सांगून हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले. भारत व ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांनी चिनी ॲप्सवर बंदी टाकल्याचा उल्लेखही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या वटहुकूमात केला आहे. या पार्श्वभूमीवरच, ४५ दिवसांच्या मुदतीत चिनी ॲप्सची मालकी असलेल्या दोन्ही कंपन्यांना आपले अमेरिकेतील व्यवहार पूर्ण करायचे असून, त्यानंतर कोणतेही व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांची कारवाई चिनी कंपन्यांसह कम्युनिस्ट राजवटीला मोठा धक्का असल्याचे मानले जाते. टिकटॉकची मालकी असलेल्या चिनी कंपनीने आपल्याविरोधातील कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करून कायदेशीर दाद मागण्याची घोषणा केली आहे. वुईचॅटची मालकी असणाऱ्या टेंसेन्ट कंपनीचे शेअर्स दहा टक्क्यांनी आपटले असून, या कंपनीची गुंतवणूक असणाऱ्या अमेरिकी कंपन्यांच्या व्यवहारांवर परिणाम होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या कारवाईवर चीनच्या सत्ताधाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून मायक्रोसॉफ्ट व ॲपल यासारख्या अमेरिकी कंपन्यांवर कारवाई होऊ शकते, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काढलेल्या वटहुकूमांपूर्वी बुधवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘क्लीन नेटवर्क प्रोग्राम’ची घोषणा केली होती. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीसारख्या घटकांपासून अमेरिकेचे दूरसंचार क्षेत्र व तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी या उपक्रमाची घोषणा करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिली होती. त्यात अमेरिकेसाठी धोकादायक ठरणाऱ्या चिनी मोबाईल कंपन्या व चिनी ॲप्सना दूर ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येतील असे सांगण्यात आले होते.

leave a reply