तुर्कीतील अल कायदा समर्थकांवर अमेरिकेचे निर्बंध

अल कायदावॉशिंग्टन/अंकारा – तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असणार्‍या व अल कायदाला सहाय्य करणार्‍या पाच जणांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी निर्बंधांची घोषणा केली. निर्बंध टाकण्यात आलेल्या अल कायदा समर्थकांमध्ये तीन तुर्की व दोन इजिप्शियन नागरिकांचा समावेश आहे. यातील एका तुर्कीच्या नागरिकाचे सिरियातील अल कायदा व सहयोगी दहशतवादी गटांशी तसेच तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचे आढळले आहे.

अल कायदाअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी गेल्या आठवड्यात निर्बंधांची घोषणा केली. ‘अल कायदा व इतर दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यास अमेरिका वचनबद्ध आहे. यात त्यांना मिळणार्‍या अर्थसहाय्याचाही समावेश आहे. अमेरिकेने तुर्कीतून कार्यरत असणार्‍या अल कायदाच्या पाच समर्थकांवर निर्बंध टाकले आहेत. अमेरिका, अमेरिकेचे हितसंबंध व अमेरिकी नागरिकांना हानी पोहोचविणार्‍यांना यापुढेही लक्ष्य केले जाईल’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी कारवाईची माहिती दिली.

अमेरिकेच्या अर्थ विभागातील ‘ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट्स कंट्रोल’ने निर्बंध टाकण्यात आलेल्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात तुर्कीच्या गुरलेन सोनेर, गुझेल सेब्रेल, मुसलिहान नुरेतिन यांचा समावेश आहे. अल गझलानी व सलिम मजदी हे इजिप्शिअन असून मजदी वकील असल्याचे समोर आले आहे. तर अल गझलानी ‘फायनान्शिअल कुरिअर’ म्हणून काम करीत असल्याचे उघड झाले आहे.

अल कायदातुर्कीच्या गुरलेन सोनेरचे तुर्की गुप्तचर यंत्रणा व सिरियातील अल कायदा तसेच समर्थक गटांशी संबंध असल्याचे सांगण्यात येते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याशी निगडीत असणार्‍या स्वयंसेवी संस्थेतही सोनेरने काम केल्याचा दावा करण्यात येतो. गेल्या दशकात तुर्कीकडून सिरियातील अल कायदा तसेच इतर दहशतवादी गटांना शस्त्रपुरवठा करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात सोनेरने मध्यस्थ म्हणून काम केल्याचेही सांगण्यात येते.

२०१६ साली रशियाने संयुक्त राष्ट्रसंघाला पुरविलेल्या अल कायदा समर्थकांच्या यादीत सोनेरचे नाव होते. त्यानंतर २०१९ साली त्याला नायजेरच्या यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. आफ्रिकेतील दहशतवादी संघटनांना शस्त्रपुरवठा करण्याच्या गुन्ह्याखाली ही कारवाई करण्यात आली होती. आता अमेरिकेनेही त्याच्यावर निर्बंधांची कारवाई केली असून या प्रकरणात तुर्की यंत्रणांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर अल कायदा पुन्हा संघटित होत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी यंत्रणांनी केलेली कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply