अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची तालिबानशी चर्चा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सोमवारी तालिबानशी चर्चा केल्याचे समोर आले आहे. कतारमधील तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी ही माहिती दिली. या चर्चेत तालिबानने अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात असलेल्या ४००हून अधिक कैद्यांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला, असे प्रवक्त्यांनी सांगितले. अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबानशी चर्चा करण्याची गेल्या दोन महिन्यांमधील ही दुसरी वेळ आहे.

America-Talibanकाही दिवसांपूर्वी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद मधील तुरुंगावर हल्ला चढविला होता. या तुरुंगात आयएस तसेच तालिबानच्या दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. हल्ल्यामध्ये काही दहशतवाद्यांनी पळ काढल्याचेही सांगण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबानशी केलेली चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरते.

सोमवारी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी कतारमधील तालिबानचे उपनेते म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मुल्लाह अब्दुल गनी बरदारशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या चर्चेत तालिबानने अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात असलेल्या ४००हून अधिक कैद्यांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला. अफगाणिस्तान सरकार व इतर घटकांशी चर्चा सुरू करण्याच्या मुद्द्यावरही बोलणी झाल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यांनी दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी झालेल्या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया अथवा निवेदन प्रसिद्ध केलेले नाही.

२९ फेब्रुवारी रोजी कतारच्या दोहामध्ये तालिबान आणि अमेरिकेमध्ये शांतीकरार पार पडला होता. या करारानुसार, तालिबानने अफगाणिस्तानातील हल्ले थांबविण्याचे मान्य केले होते. तर अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शविली होती. अमेरिका व तालिबानमध्ये पार पडलेल्या वाटाघाटींचा भाग नसतानाही अफगाणिस्तान सरकारने तालिबानचे पाच हजार कैदी सोडण्यास मंजुरी दिली होती. तालिबानने अफगाणिस्तान सरकारशी संबंधित असलेल्या एक हजार जणांना सोडण्याचे मान्य केले होते.

America-Talibanत्यानुसार अफगाणिस्तान सरकारने आतापर्यंत तालिबानच्या सुमारे साडेचार हजारांहून अधिक कैद्यांची सुटका केली आहे. मात्र उर्वरित कैदी बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा दावा करून राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी त्यांच्या सुटकेसाठी नकार दिला आहे. हा मुद्दा अफगाण सरकार व तालिबानमधील संभाव्य शांतीचर्चेतील मुख्य अडथळा ठरला आहे. त्यामुळे तालिबानने आता त्यावर जोर देण्यास सुरुवात केली असून अमेरिकेकडेही त्याचसंदर्भात मागणी केल्याचे सोमवारी झालेल्या चर्चेतून समोर येत आहे.

गेल्या महिन्यात तालिबानशी झालेल्या चर्चेत अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी वाढत्या हिंसाचाराबद्दल बजावले होते. तालिबानने २९ फेब्रुवारी रोजी केलेल्या शांतीकराराचे पालन करावे आणि अफगाणिस्तानातील अमेरिकन्सवर हल्ला चढवू नये, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला होता. पॉम्पिओ यांनी तालिबानला शांतीकरारामधील अटींची आठवणही करुन दिली होती. त्यानंतर काही दिवसांनीच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी, अफगाणिस्तानातला तालिबानचा हिंसाचार वाढत असल्याची कबुली दिली होती. अमेरिका व तालिबानमधल्या शांतीकरारानंतर तालिबानने घडविलेल्या हिंसाचारात, बळी गेलेल्या तसेच जखमी अफगाण जवानांची संख्या १० हजारांवर गेल्याचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी सांगितले होते.

leave a reply