इस्रायलबरोबरच्या सहकार्यासाठी अमेरिकेने ‘आण्विक सहकार्य’ करावे

सौदी अरेबियाची अमेरिकेकडे मागणी

वॉशिंग्टन – इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये सहकार्य प्रस्थापित व्हावे, इतर अरब देशांप्रमाणे सौदीने देखील इस्रायलसोबत अब्राहम करार करावा, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून याबाबतच्या बातम्या समोर येत होत्या. सौदी देखील अमेरिकेचा हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी तयार आहे. पण त्याआधी अमेरिकेने सौदीच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, तसेच आपला नागरी अणुकार्यक्रम विकसित करण्यासाठी सहाय्य करावे, अशी मागणी सौदीने केली आहे. अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली.

netanyahu bidenगेल्या काही दिवसांपासून बायडेन प्रशासन इस्रायल व सौदीमध्ये सहकार्य घडविण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती समोर आली होती. सौदीने इस्रायलबरोबरच्या सहकार्यासाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला होता. इस्रायलमधील नेत्यान्याहू यांचे सरकार पॅलेस्टाईनच्या मुद्याबाबत गंभीर नसल्याचा दावा केला जातो. यामुळे इस्रायल व सौदीमधील सहकार्य अवघड असल्याचे बोलले जात होते. पण ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकन वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदी इस्रायलबरोबरच्या सहकार्यासाठी तयार झाला आहे. पण त्याआधी अमेरिकेने सौदीच्या सुरक्षेची हमी घ्यावी, अशी पहिली मागणी केली. तसेच सौदी उभारत असलेल्या अणुकार्यक्रमासाठी अमेरिकेने सहाय्य पुरवावे, अशी दुसरी मागणी केली. गेल्याच वर्षी बायडेन प्रशासनाने सौदीच्या सुरक्षेसाठी तैनात हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेतली होती. त्यामुळे सौदीची ही मागणी बायडेन प्रशासनाला कोंडीत पकडणारी ठरू शकते.

इस्रायलच्या पंतप्रधानपदावर येताच सौदी अरेबियाबरोबर अब्राहम करार करण्याला आपण प्राधान्य देऊ, असे बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले होते. सौदीशी सहकार्य प्रस्थापित झाले तर आखातातील अनेक प्रश्न सुटतील, असा दावा नेत्यान्याहू यांनी केला होता. गेल्या दोन वर्षात बायडेन प्रशासनाने या सहकार्याला महत्त्व दिले नव्हते. पण युक्रेनमधील संघर्षात रशियाला सौदीकडून मिळत असलेल्या समर्थनाच्या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाने इस्रायल व सौदीत सहकार्य घडवून रशियाला एकटे पाडण्यासाठी नवा डाव टाकल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काही तासांपूर्वीच चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीमध्ये संबंध सुरळीत करण्यावर चर्चा पार पडली होती. सिरियाने या नव्या सहकार्याबाबत आशावादी असल्याचे म्हटले आहे. तर यामुळे सौदीबरोबरच्या संभाव्य सहकार्यावर परिणाम होणार नसल्याचे इस्रायलने ठासून सांगितले आहे.

leave a reply