उत्तर कोरियाकडून सहा क्षेपणास्त्रांची चाचणी

सेऊल – उत्तर कोरियाच्या लष्कराने पश्चिम किनारपट्टीवरून लघू पल्ल्याची सहा क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश असल्याचा दावा केला जातो. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यावेळी उपस्थित होते. दक्षिण कोरियातील हवाईतळांवर हल्ल्याचा सराव म्हणून ही क्षेपणास्त्रे डागल्याचे उत्तर कोरियाच्या राजवटीने जाहीर केले. या सरावाद्वारे उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला इशारा दिल्याचा दावा केला जातो.

उत्तर कोरियाकडून सहा क्षेपणास्त्रांची चाचणीउत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये लष्कराने ‘नॅम्पो’ शहराच्या किनारपट्टीवरून सहा क्षेपणास्त्रे डागली. यातील पाच क्षेपणास्त्रे सरळ रेषेत तर सहावे क्षेपणास्त्रे थोड्या अंतरावरून डागण्यात आले. सदर सहावे लघू पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असल्याचा दावा उत्तर कोरियन वृत्तवाहिनीने केला. उत्तर कोरियाचे हुकूमशहा आपल्या लेकीसह ही क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी उपस्थित होते, असेही या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे.

उत्तर कोरियाच्या शत्रूला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या लष्कराने तयार रहावे, असा संदेश किम जाँग-उन यांनी या चाचणीनंतर आपल्या लष्कराला दिला. सदर चाचणी म्हणून दक्षिण कोरियाच्या हवाईतळ तसेच प्रमुख ठिकाणांवरील हल्ल्याचा सराव होता, असे उत्तर कोरियन वृत्तवाहिनीने म्हटले आहे. गुरुवारी प्रक्षेपित करण्यात आलेली ही क्षेपणास्त्र लघू पल्ल्याची असली तरी ही सारी आण्विक स्फोटकांनी सज्ज करता येऊ शकतात, असा दावा उत्तर कोरियन वृत्तवाहिनीने केला.

येत्या सोमवारपासून अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्कराला दहा दिवसांचा युद्धसराव सुरू होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करात वेगवेगळ्या स्तरावर युद्धसराव पार पडले आहेत. या प्रत्येक युद्धसरावाला उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचणीने उत्तर दिले होते. पण गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करातील सर्वात मोठा युद्धसराव सोमवारपासून सुरू होणार आहे. यासाठी अमेरिकेची अण्वस्त्रवाहू बॉम्बर विमाने दक्षिण कोरियात दाखल झाली आहे. पण अमेरिका व दक्षिण कोरियाचा हा युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरिया करीत आहे. तसेच सदर सराव म्हणजे अणुयुद्धाची चिथावणी असल्याचा ठपका ठेवून उत्तर कोरियाने देखील अमेरिका व दक्षिण कोरियाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.

हिंदी

 

leave a reply