फेडरल रिझर्व्हच्या भाकितानंतर बिटकॉईनच्या दरात उसळी

वॉशिंग्टन – अमेरिकेची मध्यवर्ती बँक असणाऱ्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरासंदर्भात केलेल्या भाकितानंतर ‘बिटकॉईन’ या क्रिप्टोकरन्सीचे दर १० हजार डॉलर्सपर्यंत उसळले. कोरोनाच्या साथीबाबत असलेली भीती व जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून अर्थसहाय्याबाबत होणाऱ्या घोषणा, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, आभासी डिजिटल चलन असणाऱ्या क्रिप्टोकरन्सीकडील ओढा वाढत असून बिटकॉईनचे मूल्य १० हजार डॉलर्सपर्यंत जाणे त्याचेच संकेत मानले जातात.

फेडरल रिझर्व्ह, बिटकॉईन

बुधवारी झालेल्या ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी, २०२२ सालापर्यंत व्याजदर शून्य टक्क्याच्या जवळपासच राहतील अशी, माहिती दिली. ‘सध्या भविष्याबाबत प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊन स्थैर्य व दिलासा मिळावा यासाठी फेडरल रिझर्व्ह आपल्या हाती असलेल्या साधनांचा जास्तीत जास्त कालावधीसाठी वापर करेल’, असे पॉवेल यांनी सांगितले. फेडरल रिझर्व्हकडून सध्या सुरू असलेली रोखे खरेदीची योजना पुढेही कायम राहील असेही प्रमुखांनी स्पष्ट केले.

फेडरल रिझर्व्हच्या घोषणेतून नजीकच्या काळात अमेरिकी डॉलरच्या मूल्यात अथवा मागणीत विशेष फरक पडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी आपले लक्ष बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीकडे वळवल्याचे मानले जाते. गुंतवणूकदारांचा कल वाढल्यामुळेच बिटकॉईनच्या दराने १० हजार डॉलर्सपर्यंत उसळी घेतली. काही काळाने हे दर ९,६०० डॉलर्सपर्यंत खाली घसरले. क्रिप्टोकरन्सीच्या दरातील प्रचंड चढउतार ही त्यात होणाऱ्या व्यवहारांसाठी सामान्य बाब मानली जात असली तरी बिटकॉईनने घेतलेली १० हजार डॉलर्सपर्यंतची उसळी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

फेडरल रिझर्व्ह, बिटकॉईन

डिसेंबर २०१७ मध्ये बिटकॉईनचा दर २० हजार डॉलर्सनजीक जाऊन पोहोचला होता. मात्र जानेवारी २०१९ पर्यंत बिटकॉईनचे मूल्य ३,२४७ डॉलर्सपर्यंत घसरले होते. त्यानंतर बिटकॉईनच्या दरांमध्ये सामान्य चढ-उतार चालू राहिले आहेत. मात्र या वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर बिटकॉईनच्या दरांमध्ये पुन्हा वाढ दिसू लागली आहे. काही अर्थतज्ञ व विश्लेषकांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत हे दर १५ हजार डॉलर्स व त्याहून वर जातील असे भाकितही वर्तवण्यात सुरुवात केली आहे.

गेल्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही बिटकॉईन व इतर आभासी चलनांबाबत इशारा दिला होता. आपण ‘बिटकॉईन’ अथवा इतर कोणत्याही ‘क्रिप्टोकरन्सीज्’ चाहते नसल्याचे सांगून या क्रिप्टोकरन्सी म्हणजे खरा पैसा नसल्याचे ट्रम्प यांनी बजावले होते. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनीही क्रिप्टोकरन्सी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही नुकताच यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून त्यात क्रिप्टोकरन्सीचा वापर नव्या पिढीकडून सरकारविरोधात बंड करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

leave a reply