चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका तैवानमधील लष्करी तैनाती वाढविणार

- अमेरिकी दैनिकाचा दावा

वॉशिंग्टन/तैपई – चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानमधील लष्करी तैनाती वाढविण्याचे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसात अमेरिका तैवानमध्ये १०० ते २०० जवान पाठविणार असल्याचे वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने दिले. अमेरिकेने तैवानमध्ये छोटी लष्करी तुकडी तैनात केल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग वेन यांनीही त्याची कबुली दिली होती.

गेल्या वर्षभरात चीनकडून तैवानवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याची शक्यता सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. अमेरिका तसेच तैवानचे लष्करी अधिकारी, विश्लेषक तसेच नेते या मुद्यावर सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चिनी जनतेचा विश्वास मिळविण्यासाठी तैवानवर हल्ल्याची आगळीक करू शकतात, अशी भीती तैवानच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी अमेरिकी संसदेच्या तत्कालिन सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनच्या आक्रमकतेमध्ये वाढ झाली आहे. पेलोसी यांच्या भेटीनंतर अमेरिकेसह, फ्रान्स व जपानच्या लोकप्रतिनिधींनी तैवानचा दौरा केला आहे. यावर संताप व्यक्त करून चीनने तैवानच्या हवाई व सागरी हद्दीजवळची गस्त वाढविली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला तैवानविरोधी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेशही दिले आहेत. चीनची लढाऊ विमाने व विनाशिकांची तेवानी हद्दीतील घुसखोरीही वाढली असून ही प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वीची तालीम असू शकते, असा दावा करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह मित्रदेश तैवानच्या मुद्यावर अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात चीनची तैवानमधील घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या ‘ऑकस’ देशांनी युद्धसराव केला होता. एफ-२२ रॅप्टर्स, बी-२ बॉम्बर्स, युरोफायटर टायफून्स, ईए-१८जी ग्रॉलर्स अशा प्रगत लढाऊ आणि बॉम्बर्स विमानांचा यात समावेश होता. येत्या काळात चीनने तैवानचा ताबा घेतलाच तर तैवानच्या मुक्ततेसाठी केल्या जाणाऱ्या कारवाईचा अभ्यास या सरावात केला गेला, असे लष्करी विश्लेषकांनी केला होता.

त्यानंतर अमेरिकी शिष्टमंडळाच्या तैवान भेटीत राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी अमेरिकेबरोबरील संरक्षणसहकार्य अधिक बळकट करण्यावर भर देण्याचा उल्लेख केला होता. अमेरिकेने तैवानमधील लष्करी तैनातीत वाढीबाबत केलेली घोषणा हा अमेरिकेने दिलेला संदेश असल्याचा दावा तैवानी अधिकारी करीत आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून पाठविण्यात येणारी लष्करी तुकडी तैवानी लष्कराला प्रगत शस्त्रे व लष्करी डावपेचांचे प्रशिक्षण देईल, असा दावा करण्यात येतो.

अमेरिकेच्या ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाने केलेल्या दाव्यानुसार, तैवानी लष्कराला अमेरिकेतही प्रशिक्षण देण्यात येत आहे. तैवानी लष्कराची तुकडी मिशिगन नॅशनल गार्डकडून प्रशिक्षण घेत असल्याचा दावा दैनिकाने आपल्या वृत्तात केला आहे. अमेरिका व तैवानमधील या वाढत्या संरक्षण सहकार्यावर चीनने यापूर्वीच आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेने अतिरिक्त लष्करी जवान तैवानमध्ये पाठविल्यास चीनकडून अधिक आक्रमक प्रतिक्रिया उमटू शकते.

leave a reply