उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा जपान व दक्षिण कोरियाबरोबर व्यापक सराव

टोकिओ/सेऊल – उत्तर कोरियाकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या व धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेल्या काही दिवसात अमेरिकेने जपान, दक्षिण कोरिया तसेच ऑस्ट्रेलियाबरोबर सराव केल्याची माहिती संरक्षणदलांकडून देण्यात आली. या सरावात ‘बॅलिस्टिक मिसाईल्स डिफेन्स ड्रिल्स’चाही समावेश आहे. गेल्या रविवारीच दक्षिण कोरिया व अमेरिकेने कोरियाच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये हवाईसराव केला होता. या सरावात ‘एफ-१५’, ‘एफ-१६’ व ‘एफ-३५’ या लढाऊ विमानांसह अमेरिकेचे बॉम्बर विमानही सहभागी झाले होते.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने जपानबरोबर ‘आयर्न फिस्ट २०२३’ सरावाला सुरुवात केली. हा सराव १२ मार्चपर्यंत सुरू राहणार असून यात अमेरिकेचे ‘मरिन कॉर्प्स’ व जपानच्या लष्करी तुकड्या सहभागी झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला अमेरिका व जपानच्या नौदलामध्ये ‘रिझायलंड शिल्ड २०२३’ हा सराव गुरुवारी संपन्न झाला. या सरावात ‘मिसाईल डिफेन्स’च्या अभ्यासावर भर देण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’कडून देण्यात आली.

बुधवारी ‘सी ऑफ जपान’मध्ये अमेरिका-जपान-दक्षिण कोरिया अशा त्रिपक्षीय सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावादरम्यान तिन्ही देशांच्या क्षेपणास्त्रभेदी तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात आल्या. सरावादरम्यान अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांची बैठकही पार पडल्याची माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली.

अमेरिकेच्या गुआम तळावर ‘केप नॉर्थ २०२३’ सराव पार पडला असून त्यात जपानबरोबर ऑस्ट्रेलिया व फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता.

leave a reply