अमेरिका दक्षिण कोरियासाठी आण्विक पाणबुडी रवाना करणार

- वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा

वॉशिंग्टन/सेऊल – उत्तर कोरियाच्या वाढत्या आण्विक धोक्याविरोधात आपल्या सहकारी देशाची सुरक्षा करण्यासाठी अमेरिका दक्षिण कोरियात आण्विक पाणबुडी तैनात करू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांच्यातील चर्चेत ही घोषणा अपेक्षित असल्याचा दावा संबंधित अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला. मात्र बायडेन प्रशासनाने आण्विक पाणबुडी रवाना करण्यापेक्षा दक्षिण कोरियात अण्वस्त्रांची नव्याने तैनाती करावी, असे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सुचविले. यामुळे उत्तर कोरियासह अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या देशांना आवश्यक तो कडक संदेश जाईल, असे बोल्टन यांचे म्हणणे आहे.

अमेरिका दक्षिण कोरियासाठी आण्विक पाणबुडी रवाना करणार - वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावागेल्या दोन वर्षात उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांची तीव्रता वाढविली आहे. सारे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे असल्यामुळे उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांची मोजणी मध्येच थांबविल्याची कबुली अमेरिकन अधिकाऱ्यांनी काही आठवड्यांपूर्वी दिली होती. पण कोरियन क्षेत्रातील घडामोडींकडे आपली बारीक नजर असल्याचे सांगून अमेरिकेने जपान व दक्षिण कोरियाला सोबत घेऊन उत्तर कोरियाच्या विरोधात नवे लष्करी धोरण आखत असल्याचे जाहीर केले होते. तर उत्तर कोरिया सातवी अणुचाचणी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

अशा परिस्थितीत, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल बुधवारी अमेरिकेत दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष येओल येत्या काही तासात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतील. दक्षिण कोरियन जनतेला बायडेन प्रशासनावर विश्वास उरला नसल्याचा सर्वेक्षण अहवाल काही आठवड्यांपूर्वी समोर आला होता. येत्या काळात उत्तर कोरियाने आपल्या देशावर हल्ला चढविला तर अमेरिका आमचे संरक्षण करील, हे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, असे मत दक्षिण कोरियन नागरिकांनी नोंदविले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या भेटीकडे कोरियन क्षेत्रातील विश्लेषक व माध्यमांचे लक्ष लागले आहे.

अमेरिका दक्षिण कोरियासाठी आण्विक पाणबुडी रवाना करणार - वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावाउत्तर कोरियाच्या धोक्याविरोधात आपल्या सहकारी देशाच्या सुरक्षेसाठीच्या वचनबद्धतेवर बायडेन प्रशासन ठाम असल्याचे अमेरिकी वृत्तसंस्था ठामपणे सांगत आहेत. दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी अमेरिका आपली अणुऊर्जेवर चालणारी अतिप्रगत पाणबुडी बुसान बंदरात तैनात करील, असा दावा वरिष्ठ अमेरिकन अधिकारी करीत आहेत. त्याचबरोबर कोरियन क्षेत्र अण्वस्त्रमुक्त करण्याच्या मुद्यावरही बायडेन-येओल यांच्यात चर्चा शक्य असल्याचे संकेत व्हाईट हाऊसकडून दिले जात आहेत. पण आण्विक पाणबुडीच्या तैनातीने काही साध्य होणार नसल्याचे टीका अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केली.

उत्तर कोरियाच्या धोक्याला उत्तर द्यायचे असेल तर दक्षिण कोरियात पुन्हा अण्वस्त्रांची तैनाती करावी, असे बोल्टन यांनी सुचविले आहे. यामुळे दक्षिण कोरियाचा अमेरिकेच्या वचनबद्धतेवरील विश्वास वाढेल, असा दावा बोल्टन करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका स्थानिक सर्वेक्षणात दक्षिण कोरियन जनतेने देशाच्या सुरक्षेबाबत अमेरिकेवर भरवसा ठेवता येणार नसल्याचे म्हटले होते. अमेरिकेवर विसंबून राहण्यापेक्षा दक्षिण कोरियाने अण्वस्त्रसज्जतेसाठी प्रयत्न सुरू करावे, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला होता. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील तसे संकेत दिले होते. अशा परिस्थितीत बायडेन-येओल यांच्या चर्चेनंतर अमेरिका कोणती घोषणा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

leave a reply