अर्जेंटिनात उतरविलेले इराणचे विमान अमेरिका ताब्यात घेणार

वॉशिंग्टन – दहशतवादी संघटनेशी संबंधित इराणचे ‘माहन’ कंपनीचे विमान ताब्यात घेण्याची सूचना अमरिकेच्या न्याय विभागाने केली. यासाठी अमेरिका अर्जेंटिनाच्या सरकारशी चर्चा करणार आहे. दीड महिन्यांहून अधिक काळ अर्जेंटिनाने इराणचे हे विमान व त्यातील कर्मचाऱ्यांना ताब्यात ठेवले आहे.

us-iran-plane8 जून रोजी माहन कंपनीचे विमान मेक्सिकोतून अवैधरित्या अर्जेंटिनात दाखल झाले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित हे विमान असल्याचा आरोप झाला होता. बेकायदेशीररित्या देशात प्रवेश केल्यामुळे अर्जेंटिनाच्या सुरक्षा यंत्रणेने सदर विमान ताब्यात घेऊन पाच कर्मचाऱ्यांना अटक केली होती. या विमानातून शस्त्रांची तस्करी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

या विमानाचा वैमानिक हा इराणच्या कुद्स फोर्सचा वरिष्ठ अधिकारी असल्याचा आरोप अर्जेंटिनाचे संसद सदस्य जेराडो मिल्मन यांनी केला होता. तर देशात घातपात घडविण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा मिल्मन यांनी केला होता. इराणने मिल्मन यांचे आरोप फेटाळून या विमानाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला होता.

पण अमेरिकेच्या न्याय विभागाने सदर विमान ताब्यात घेण्याची सूचना करून या वादात उडी घेतली आहे. अमेरिकेने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे. तसेच माहन एअरलाईन्सच्या विमानातून सिरियात शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याचा आरोप अमेरिकेने याआधी केला होता.

leave a reply