मंदी, कोरोना व ‘रिअल इस्टेट क्रायसिस’च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी चीनच्या बाजारपेठेकडे पाठ फिरविली

- ‘आयआयएफ’ या अभ्यासगटाच्या अहवालातील दावा

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारवॉशिंग्टन/बीजिंग – जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनला बसणारे धक्क्यांचे सत्र कायम आहे. गेल्या महिन्यात चीनचा आर्थिक विकासदर 0.4 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही चीनकडे पाठ फिरवित आहेत. अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स’(आयआयएफ) या अभ्यासगटाने दिलेल्या अहवालानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात चीनच्या रोखे व समभागांमधून मोठ्या प्रमाणात निधी काढून घेतला आहे. त्याचवेळी चीनकडून परदेशातील गुंतवणूकही घटली असून रशिया व पाकिस्तान यासारख्या चीनच्या आघाडीच्या मित्रदेशांनाही त्याचा फटका बसला आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स’च्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यात परदेशी गुंतवणुकदारांकडून चीनच्या वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूक घटत चालली आहे. चिनी रोख्यांची बाजारपेठ जवळपास 20 ट्रिलियन डॉलर्सची आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनाचे सातत्याने होणारे उद्रेक, कम्युनिस्ट राजवटीकडून तंत्रज्ञ्ाान क्षेत्रातील कंपन्यांवर झ्ाालेली कारवाई व ‘रिअल इस्टेट क्रायसिस’ यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची मोठी घसरण सुरू झालेली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता असून याच कारणामुळे ते चीनमधील आपली गुंतवणूक काढून घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारचीनच्या रोख्यांच्या बाजारपेठेतून सलग सहा महिने परदेशी गुंतवणूकदार आपला निधी काढून घेत आहेत. जुलै महिन्यात रोख्यांसह चिनी समभागांमधूनही परदेशी गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतल्याचे समोर आले. जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी रोख्यांमधून काढलेल्या निधीचे मूल्य तब्बल तीन अब्ज डॉलर्स इतके आहे. तर गेल्या सहा महिन्यात चीनच्या शेअरबाजारातून साडेतीन अब्ज डॉलर्स निधी काढून घेण्यात आला आहे. चीनमधील आघाडीचा शेअरनिर्देशांक असणाऱ्या ‘सीएसआय 300’मध्ये जुलै महिन्यात सात टक्क्यांची घसरण झाली होती. चीनच्या शेअरबाजारातून निधी बाहेर पडत असतानाच ‘इमर्जिंग मार्केटस्‌‍’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या इतर देशांमध्ये अडीच अब्ज डॉलर्सचा निधी गुंतविण्यात आला, याकडे ‘आयआयएफ’ने लक्ष वेधले आहे. पुढील काळात चीनच्या अर्थव्यवस्थेतील आकडेवारी तसेच चीन-तैवान तणाव यासारख्या विविध घटकांवर चीनमधील परदेशी गुंतवणुकीचा ओघ अवलंबून राहिल, अशी नोंद अभ्यासगटाने अहवालात केली आहे. येत्या काही महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसण्याचे संकेतही आघाडीच्या वित्तसंस्थांकडून देण्यात आले आहेत. त्याचेही पडसाद चीनमधील गुंतवणुकीवर दिसून येतील, असा दावा ‘आयआयएफ’ने केला.

चीनमधील परदेशी गुंतवणूक कमी होत असतानाच चीनकडून परदेशात होणारी गुंतवणूकही घटत चालली आहे. गेल्या दशकात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ची सुरुवात केली होती. याद्वारे जगभरात एक ट्रिलियन डॉलर्सहून अधिक निधी गुंतवणूक करण्यात येणार होती. सुरुवातीच्या काळात यातील सर्वाधिक गुंतवणूक पाकिस्तान व रशियासारख्या मित्रदेशांमध्ये करण्यात आली होती. मात्र चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यांचे पडसाद या देशांमधील गुंतवणुकीवरही उमटले आहेत. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’अंतर्गत रशियात शून्य गुंतवणूक झ्ााली आहे. तर पाकिस्तानमधील गुंतवणूक तब्बल 56 टक्क्यांनी घसरली आहे.

leave a reply