लॅटीन अमेरिकेतील चीन व रशियाचा वाढता प्रभाव अमेरिकेसाठी धोकादायक

- अमेरिकेच्या सदर्न कमांडच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – साऱ्या जगाचे लक्ष युक्रेनमधील युद्ध आणि तैवानजवळच्या लष्करी तणावाकडे केंद्रीत झाले आहे. पण अमेरिकेपासून 20 यार्ड अंतरावरील दक्षिण गोलार्धात लॅटीन अमेरिकी देशांमधील चीन व रशियाचा वाढता प्रभाव अमेरिकेसाठी धोकादायक ठरू लागला आहे, असा इशारा अमेरिकेच्या सदर्न कमांडच्या प्रमुख जनरल लॉरा रिचर्डसन यांनी दिला. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, या क्षेत्रात अमेरिकेचे मोठे हितसंबंध गुंतलेले असून त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला आपल्या भूमिकेत वाढ करावी लागेल, असे आवाहनही जनरल रिचर्डसन यांनी केले.

आत्तापर्यंत अमेरिकेने युरोपिय देशांएवढे लॅटीन अमेरिकी देशांबरोबरच्या संबंधांना तितकेसे महत्त्व दिलेले नाही, याकडे अमेरिकेतील अभ्यासगट लक्ष वेधत आहेत. लॅटीन अमेरिकेतील अमेरिकेच्या मित्रदेशांनीही याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काही वर्षांपूर्वी मेक्सिकोने अमेरिकेबरोबरच्या व्यापारी सहकार्यातून माघार घेण्याचा इशाराही दिला होता. पण अमेरिकेच्या सदर्न कमांडच्या प्रमुख जनरल लॉरा रिचर्डसन यांनी जाहीररित्या या क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम संभवतील, असे बजावले आहे.

लॅटीन अमेरिकेतील 20 देशांमध्ये चीनने ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’ अंतर्गत येथील देशांना मोठ्या प्रमाणात निधी पुरविला आहे. या प्रकल्पांतर्गत चीन लॅटीन तसेच मध्य अमेरिकी देशांमध्ये महामार्ग, रेल्वे आणि बंदरांचे मोठे जाळे विणत असून हेरगिरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चिनी कंपन्या या देशांमध्ये 5जी नेटवर्क उभारत आहे. चीनची राजवट याचा वापर लष्करी वापरासाठी देखील करू शकते, या धोक्याकडे जनरल रिचर्डसन यांनी लक्ष वेधले. काही लॅटीन अमेरिकी देश चीनच्या डेब्‌‍ ट्रॅपमध्ये अर्थात कर्जाच्या सापळ्यात अडकत असल्याचा दावा अमेरिकेच्या सदर्न कमांडप्रमुखांनी केला.

तर लॅटीन अमेरिकेतील क्युबा, व्हेनेझुएला आणि निकारगुआसारख्या देशांमधील डाव्या विचारसरणीची राजवट रशियाच्या गटात आहे. हे देश अजूनही रशियाकडून खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करीत आहेत. या देशांमधील रशियाचा प्रभाव कमी करण्यासाठी सदर्न कमांडचे प्रयत्न सुरू आहेत. लॅटीन अमेरिकेतील सर्व देशांनी रशियन शस्त्रास्त्रे युक्रेनसाठी रवाना करावी, यासाठी अमेरिकेने या देशांना आवाहन केले आहे. पण त्यासाठी अमेरिकेने लॅटीन अमेरिकेतील चीन-रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमध्ये आपली गुंतवणूक वाढविणे आवश्यक असल्याचे जनरल रिचर्डसन यांनी लक्षात आणून दिले.

leave a reply