अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या गोंधळामुळे इस्रायल व आखाती देशांमधील सहकार्य वाढेल

- इस्रायली वर्तमानपत्राचा दावा

सहकार्य वाढेलजेरूसलेम – यापुढे इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहता येणार नाही. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीच्या गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून हा धडा घेता येईल. अफगाणिस्तानमुळे तालिबानसारख्या दहशतवादी संघटना अधिक मजबूत होतील. त्याचवेळी अब्राहम करारात सहभागी असलेल्या इस्रायल आणि आखाती देशांमधील सहकार्य वाढेल, असा दावा इस्रायलच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे. येत्या काळात सौदी अरेबिया देखील या सहकार्यात सहभागी होण्याची शक्यता इस्रायली वर्तमानपत्राने वर्तविली.

गेल्या आठवड्यात तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तालिबानला मिळालेल्या यशासाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन जबाबदार असल्याची टीका होत आहे. बायडेन प्रशासनाने अफगाणींकडे पाठ फिरविल्याचा आरोप अमेरिकेतूनच होत आहे. अफगाणिस्तानातील सैन्यमाघार घेऊन बायडेन यांनी जगभरातील अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांना चुकीचे संकेत दिल्याचे ताशेरे अमेरिकेचे माजी नेते व सिनेटर ओढत आहेत.

ब्रिटनने अमेरिकेच्या अफगाणिस्तानबाबतच्या या निर्णयावर टीका केली होती. अफगाणिस्तानातील तालिबानचा विजय हा जगभरातील दहशतवादी संघटनांना बळ देणारा ठरेल, असा इशारा ब्रिटनचे माजी गुप्तचर प्रमुख व निवृत्त लष्करी अधिकारी देत आहेत. अल कायदा व अल कायदाशी संलग्न असलेल्या आखाती व आफ्रिकेतील दहशतवादी संघटना तसेच अल कायदाच्या प्रभावाखाली असलेले युरोपमधील कट्टरपंथीयांकडून असलेला धोका यामुळे वाढल्याचे लष्करी अधिकारी व विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

इस्रायलमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने देखील अफगाणिस्तानातील सध्याच्या गोंधळाकडे लक्ष वेधले. बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानबाबतच्या निर्णयामुळे यापुढे अमेरिकेवर अवलंबून राहता येणार नसल्याचे इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे. कारण तालिबानच्या विजयामुळे मोरोक्को ते इजिप्त, जॉर्डन ते सौदी अरेबिया आणि युएईच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या कट्टरपंथियांना बळ मिळाल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला. यासाठी सदर वर्तमानपत्राने इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीचा दाखला दिला.

सहकार्य वाढेल2013 साली अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पंतप्रधान नेत्यान्याहू यांना अफगाणिस्तानच्या छुप्या दौऱ्यावर येण्याची ऑफर दिली होती. अमेरिकेने अफगाणिस्तानातील स्थानिक टोळ्यांना दहशतवादविरोधी संघर्षासाठी तयार केले असून इस्रायलने देखील याच अफगाण मॉडेलचा वापर वेस्ट बँकमध्ये करावा, असे सुचविले होते. पण त्यावेळी केरी यांचा प्रस्ताव धुडकावून आपण योग्यच निर्णय घेतला, असा दावा नेत्यान्याहू यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.

देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न येतो तेव्हा इस्रायल कुणावरही, अगदी अमेरिकेवरही अवलंबून राहू शकत नाही, अशी शिकवण अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवरुन मिळाल्याचे नेत्यान्याहू म्हणाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2015 साली इस्रायल व इतर आखाती देशांना विश्‍वासात न घेता इराणबरोबर अणुकरार केला. यामुळे इस्रायल व आखाती देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित होऊ शकले, हे इस्रायली वर्तमानपत्राने लक्षात आणून दिले.

आत्ताही अफगाणिस्तानच्या गोंधळामुळे तालिबान व इतर दहशतवादी संघटनांपासून धोका वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी इस्रायल आणि आखाती देशांमधील सहकार्य अधिक मजबूत होईल, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला. आत्तापर्यंत सौदीने इस्रायलबरोबर औपचारिक सहकार्य प्रस्थापित केले नसले तरी, येत्या काळात उभय देशांमध्ये सुरक्षाविषयक सहकार्य प्रस्थापित होण्याची शक्यता इस्रायली वर्तमानपत्राने वर्तविली.

दरम्यान, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर, इस्रायल, सौदी अरेबिया, युएई, बाहरिन, कतार या देशांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, याकडे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply