अमेरिका इराणच्या ताफ्यात अणुबॉम्ब येऊ देणार नाही

- संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले

वॉशिंग्टन – ‘युरेनियमचे संवर्धन धोकादायक स्तरावर नेणारा इराण दोन आठवड्यात अणुबॉम्बसाठी आवश्यक इंधन मिळवू शकतो व त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो. पण काही झाले तरी इराणच्या ताफ्यात अणुबॉम्ब येऊ देणार नाही, यावर अमेरिका ठाम आहे’, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी केली. इराणला अणुबॉम्बची निर्मिती करू देणार नसल्याची अमेरिकेची याआधीची भूमिका होती. पण जनरल मिले यांनी फिल्डेड अर्थात इराणच्या ताफ्यात अणुबॉम्ब येऊ देणार नाही, असे जाहीर केल्यामुळे विश्लेषक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. बायडेन प्रशासनाच्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत यातून मिळत असल्याचा दावा हे विश्लेषक व माध्यमे करीत आहेत.

अमेरिका इराणच्या ताफ्यात अणुबॉम्ब येऊ देणार नाहीआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दहा दिवसांपूर्वी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत धक्कादायक माहिती उघड केली होती. इराणने फोर्दो अणुप्रकल्पात ८६ टक्के संवर्धित युरेनियमची निर्मिती केल्याचे आयोगाने म्हटले होते. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी ९० टक्के संवर्धित युरेनियम व सेंट्रिफ्यूजेसची आवश्यकता असते. त्यामुळे इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचल्याची शक्यता आयोगाने वर्तविली होती. यानंतर अमेरिकेतील विरोधी पक्षनेते आणि विश्लेषकांनी इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक स्तरावर पोहोचल्याचे सांगून बायडेन प्रशासनाकडून कारवाईची मागणी केली होती.

अमेरिकन काँग्रेसच्या चौकशी समितीने संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांना देखील इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत कठोर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी जनरल मिले यांनी दिलेल्या उत्तरांमुळे विश्लेषकांनी भुवया उंचावल्या आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमापासून अमेरिका व आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका संभवतो. त्यामुळे इराणला अणुबॉम्बची निर्मिती करू देणार नाही, यासाठी लष्करी कारवाईचा पर्याय स्वीकारला जाईल, अशी अमेरिकेची याआधीची भूमिका होती. इस्रायल, सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी अमेरिकेच्या या भूमिकेचे स्वागत केले होते.

पण जनरल मिले यांनी काँग्रेसच्या चौकशी समितीसमोर बोलताना इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्याच्या ऐवजी अणुबॉम्ब इराणच्या ताफ्यात येऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला. अमेरिका इराणच्या ताफ्यात अणुबॉम्ब येऊ देणार नाहीत्यामुळे बायडेन प्रशासनाने इराणबाबतच्या आपल्या भूमिकेत फार मोठा बदल केल्याचे दिसत आहे. ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने याकडे लक्ष वेधले. बायडेन प्रशासनाची इराणबाबतची भूमिका अस्पष्ट असल्याचे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

‘जनरल मार्क मिले चुकीचे बोलून गेले असतील किंवा यापुढे अणुबॉम्बच्या निर्मितीपासून इराणला रोखण्यापेक्षा याच्या इराणच्या ताफ्यात अण्वस्त्रे येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची अमेरिकेची भूमिका आहे’, याकडे अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी आणि आखातविषयक विश्लेषक डेनिस रॉस यांनी लक्ष वेधले. तर गेल्या महिन्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कॉलिन काह्ल यांनी इराण अणुबॉम्बसाठी आवश्यक इंधन मिळविण्यासाठी इराणला काही महिन्यांचा अवधी लागेल, असे म्हटले होते. पण जनरल मिले यांनी अवघ्या दोन आठवड्यात इराण हे अणुइंधन मिळवू शकतो, असे सांगून खळबळ उडवून दिल्याचे अन्य विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बायडेन प्रशासनाची इराणविषयक भूमिका अमेरिकेच्या आखातातील मित्रदेशांसाठी धोकादायक बनली असून इस्रायल व सौदी अरेबियासारखे देश अमेरिकेकडे आता विश्वासार्ह मित्रदेश म्हणून पाहत नाहीत, अशी टीका अमेरिकेचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. अशा परिस्थितीत इराणच्या अणुबॉम्बबाबत आपल्या देशाचे धोरण अजूनही अस्पष्टच असल्याचे अमेरिकी संरक्षणदलांच्या प्रमुखांनी दाखवून दिले आहे.

हिंदी English

 

leave a reply