अमेरिकेने सैन्यमाघार न घेतल्यास अफगाणिस्तानात भीषण संघर्ष पेटेल

- तालिबानचा अमेरिका आणि नाटोला इशारा

सैन्यमाघार

काबुल/इस्लामाबाद – 1 मेच्या आधी अमेरिका आणि नाटोने अफगाणिस्तानातून माघार घेतली नाही, तर दारूण संघर्ष पेट घेईल, अशी धमकी तालिबानने दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर फेरविचार करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर तालिबानने ही भीषण संघर्षाची धमकी दिली. तर अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याचे ज्या दोहा येथील करारानुसार घोषित केले होते, तो करारच तालिबानच्या हिंसक कारवायांमुळे मोडीत निघाल्याचे सांगून अफगाणिस्तानच्या सरकारने अमेरिकेच्या सैन्यमाघारीसाठी अनुकूल स्थिती नसल्याचे लक्षात आणून दिले आहे.

अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या संघर्षबंदीच्या कराराला नुकतेच वर्ष लोटले. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद अफगाणिस्तानात दाखल झाले असून लवकरच ते कतारसाठी रवाना होतील. खलिलझाद कतार येथे तालिबानच्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, तालिबानने अमेरिका आणि नाटोला इशारा दिला. यामध्ये तालिबानने अमेरिकेला वर्षभरापूर्वीच्या कराराची आठवण करून दिली.

सैन्यमाघार

‘अफगाणिस्तानात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी दोहा येथे करार झाला होता. पण या कराराची अंमलबजावणी होणार नसेल तर तालिबानही या कराराचे पालन करणार नाही’, अशी धमकी तालिबानने दिली. सदर करारानुसार अमेरिका आणि नाटोने 14 महिन्यांमध्ये अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याचे मान्य केले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला मान्यता देऊन अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केली होती. अमेरिकी लष्कराने माघार घेण्यास सुरुवातही केली होती.

सैन्यमाघारपण अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघार थांबविण्याचे आदेश दिले. तसेच सदर संघर्षबंदी करारावर फेरविचार केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर केले. अमेरिकेच्या या घोषणेचे नाटोने स्वागत केले. नुकत्याच पार पडलेल्या नाटोच्या बैठकीतही अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेणार नसल्याचे नाटोचे प्रमुख स्टोल्टनबर्ग यांनी ठामपणे सांगितले. यामुळे खवळलेल्या तालिबानने अमेरिकेला वर्षभरापूर्वीच्या कराराची आठवण करून देत 1 मेपर्यंत सैन्य माघारी घेणे आवश्यक असल्याचे बजावले.

दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांचे वरिष्ठ सल्लागार हाजी नझीर अहमदझाई यांनी संघर्षबंदीवरून तालिबानचे वाभाडे काढले. दोहा येथे ठरल्यानुसार, तालिबानने अफगाणिस्तानात संघर्षबंदीचे पालन केलेले नाही. गेल्या वर्षभरात अफगाणिस्तानात तालिबानचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे जर संघर्षबंदीच अस्तित्वात नसेल तर चर्चेमध्ये वेळ वाया घालविण्यात काय अर्थ आहे, असा सवाल अहमदझाई यांनी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

leave a reply