युक्रेन व बेलारुसमध्ये युद्ध पेट घेईल

- युक्रेनच्या संसद सदस्यांचा इशारा

मॉस्को – युक्रेन व बेलारुसदरम्यान सर्वंकष युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा युक्रेनच्या सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्यांनी दिला आहे. बेलारुसचे हुकुमशहा अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी रशियाला यासंदर्भात आश्‍वासन दिल्याचा दावा येगॉर चेर्नेव्ह यांनी केला. रशिया युक्रेनवर थेट आक्रमण करु शकत नाही, म्हणून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी हा पर्याय निवडल्याचा आरोपही चेर्नेव्ह यांनी केला. गेल्याच महिन्यात ‘अटलांटिक कौन्सिल’ या अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या एका लेखातही बेलारुस हा युक्रेनसाठी वाढता धोका ठरत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते.

युक्रेन व बेलारुसमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो - युक्रेनच्या संसद सदस्यांचा इशाराबेलारुसमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर केलेल्या कारवाईवरून पाश्‍चात्य देशांनी लुकाशेन्को यांच्यावर निर्बंध लादले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाची मदत घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारुसबरोबर संरक्षण तसेच व्यापारी करार केले आहेत. याबदल्यात बेलारुसमधील रशियन सैन्याची तैनाती वाढविण्यात आली असून नजिकच्या काळात रशियन क्षेपणास्त्र यंत्रणाही बेलारुसमध्ये तैनात होण्याचे संकेत मिळाले आहेत.

रशियाकडून मिळणार्‍या सहाय्याच्या बळावर लुकाशेन्को यांनी युक्रेनविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. काही महिन्यांपूर्वी बेलारुसने युक्रेनबरोबरची सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. युक्रेनच्या मार्गाने बेलारुसमध्ये दहशतवादी तसेच शस्त्रसाठा घुसविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्षांनी केला होता. युक्रेनकडून आपल्या राजवटीविरोधात संघर्ष करण्यासाठी बंडखोरांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यापाठोपाठ रशियाची ‘एस-४००’ ही प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा युक्रेन सीमेनजिक तैनात करण्याचेही संकेत दिले आहेत.

युक्रेन व बेलारुसमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो - युक्रेनच्या संसद सदस्यांचा इशाराहा सर्व घटनाक्रम युक्रेन व बेलारुसमधील तणाव वाढविणारा ठरला आहे. या तणावाचे रुपांतर मोठ्या युद्धात होऊ शकते, असा इशारा युक्रेनच्या संसद सदस्यांनी दिला. लुकाशेन्को यांनी आपली राजवट टिकविण्यासाठी पुतिन यांच्याशी युक्रेनवर आक्रमण करण्याचे ‘डील’ केल्याचा आरोपही येगॉर चेर्नेव्ह यांनी केला. युक्रेनवर थेट हल्ला चढविण्याचा धोका रशिया पत्करणार नाही, त्यामुळे बेलारुसच्या माध्यमातून हल्ल्याची शक्यता जास्त आहे, असेही चेर्नेव्ह यांनी म्हंटले आहे. मात्र बेलारुसकडे लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रे नसून, त्याशिवाय युक्रेनविरोधात संघर्ष शक्य नाही, असा दावाही त्यांनी केला.

गेल्या काही महिन्यात रशिया व युक्रेनमधील तणावही वाढताना दिसत आहे. युक्रेनकडून नाटो सदस्यत्वासाठी सुरू असलेल्या हालचाली, रशियाची इंधनवाहिनी, वाढते लष्करी सराव तसेच पूर्व युक्रेनमधील चकमकी ही यामागील कारणे असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच, युक्रेनने सातत्याने नाटोचा सदस्य होण्याबाबत उघड इच्छा व्यक्त करणे हा रशियाच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला होता.

leave a reply