ग्रीस व सौदी अरेबियाच्या नियोजित युद्धसरावामुळे तुर्कीत खळबळ

- सरावासाठी सौदी ‘एफ-१५’ लढाऊ विमाने धाडणार

ग्रीस व सौदी अथेन्स/अंकारा – भूमध्य सागरी क्षेत्रातील तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी आक्रमक हालचाली करणार्‍या ग्रीसने तुर्कीला अजून एक धक्का दिला आहे. नजिकच्या काळात भूमध्य सागरी क्षेत्रात ग्रीस व सौदी अरेबिया यांच्यात संयुक्त लष्करी सराव होणार असल्याचे वृत्त ग्रीक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. क्रेटे बेटावर होणार्‍या सरावासाठी सौदी अरेबिया ‘एफ-१५’ लढाऊ विमाने पाठविणार असल्याचे वृत्त तुर्कीत खळबळ उडविणारे ठरले. सौदीच्या लढाऊ विमानांची ग्रीक तळावरील तैनाती तुर्कीसाठी धोका ठरु शकतो, असा दावा तुर्कीच्या माध्यमांकडून करण्यात आला आहे.

भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणार्‍या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी तैनात केले होतेे. त्यानंतर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी तुर्कीने या भागात सातत्याने युद्धसरावही केले होते.

तुर्कीच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही हालचालींना वेग दिला आहे. ऑगस्ट महिन्यापासून ग्रीसने अमेरिका, फ्रान्स तसेच युएईबरोबर स्वतंत्ररित्या संरक्षण सराव केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात भूमध्य सागरी क्षेत्रात झालेल्या बहुराष्ट्रीय सरावात इजिप्त, सायप्रस, फ्रान्स व संयुक्त अरब अमिरात (युएई) हे देशही सहभागी झाले होते. या सरावात सौदी अरेबिया निरीक्षक देश म्हणून सहभागी झाला होता. या घटना ग्रीसकडून तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी सहकारी देशांबरोबर व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो.

ग्रीस व सौदी

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची आखाती क्षेत्रासह इस्लामी जगताचे नेतृत्त्व करण्याची महत्त्वाकांक्षा असून त्यासाठी ते वेगाने हालचाली करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना सौदी अरेबिया व इजिप्तसारख्या देशांचा तीव्र विरोध असून या मुद्यावरून संबंधित देशांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रीसने तुर्कीला विरोध करणार्‍या देशांबरोबरील संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यात तुर्कीने फ्रान्स, युएई व इस्रायल या देशांबरोबर व्यापक संरक्षण करार करून तुर्कीला योग्य संदेश दिला होता. आता सौदीबरोबर सरावाचे संकेत देऊन तुर्कीला अजून एक धक्का दिल्याचे दिसत आहे.

ग्रीक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीस व सौदी अरेबियामधील लष्करी सराव भूमध्य सागरी क्षेत्रातील क्रेटे बेटावर पार पडणार आहे. त्यासाठी या बेटावरील भव्य नौदल तळ ‘सौदा बे’वर सौदीची ‘एफ-१५’ ही लढाऊ विमाने दाखल होऊ शकतात, असे ग्रीक माध्यमांनी म्हटले आहे. ग्रीसच्या हवाईदलातील वैमानिकांनाही या विमानांचा सराव मिळणार असल्याचेही सांगण्यात येते. ग्रीसच्या हा हालचाली तुर्कीची डोकेदुखी वाढविणार्‍या असल्याचा दावा तुर्की विश्‍लेषक व माध्यमांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘एजिअन सी’ सागरी क्षेत्रातील ‘कॅलिम्नॉस’ बेटांजवळ तुर्की कोस्टगार्डने ग्रीक जहाजांना धमकावल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना दोन देशांमधील तणावात अधिक भर टाकणारी ठरु शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

leave a reply