अमेरिकेसह युरोपिय देशांमध्ये कोरोना साथीची तीव्रता वाढली

कोरोना साथीची तीव्रतावॉशिंग्टन/लंडन – जगभरातील विविध देशांमध्ये लसीकरणाची मोहीम वेग पकडत असतानाच, कोरोनाच्या साथीची तीव्रताही वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत गेले काही दिवस सातत्याने दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यापासून दररोज ५० हजारांवर रुग्ण आढळत आहेत. जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेल्या १० देशांच्या यादीत पाच युरोपिय देश असून या देशांमधील एकत्रित रुग्णसंख्या सव्वा कोटींवर गेली आहे. आफ्रिकेतही ३० लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ४० टक्के रुग्ण एकट्या दक्षिण आफ्रिकेत आढळले आहेत.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात वुहान शहरात कोरोनाव्हायरसचा पहिला बळी गेल्याचे चीनने सांगितले होते. त्यानंतर जगाला कोरोना साथीच्या दोन लाटांचा तडाला बसला असून लवकरच तिसरी लाट येण्याचेही इशारे दिले जात आहेत. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ९ कोटी, २ लाख, ९८ हजार झाली असून बळींची एकूण संख्या १९ लाख, ३५ हजार, ६१३ झाल्याची माहिती अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’ने दिली. अमेरिकेत २४ तासांमध्ये दोन लाख १३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे बळी जाणार्‍यांच्या संख्येत १,८१४ जणांची भर पडली असून एकूण संख्या ३ लाख, ७४ हजार, ३२२ झाली आहे.

कोरोना साथीची तीव्रताअमेरिकेपाठोपाठ युरोपिय देशांना कोरोनाच्या साथीचा जबर फटका बसल्याचे समोर येत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नोंदविणार्‍या १० देशांच्या यादीत ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन व जर्मनी यांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधिक ३० लाख, ८१ हजार रुग्णांची नोंद झाली असून जर्मनीतील रुग्णांची संख्या १९ लाखांवर पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यापासून दररोज ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून ६ ते ९ जानेवारी असे सलग चार दिवस एक हजारांहून अधिक बळी गेल्याची माहिती देण्यात आली. ब्रिटनमधील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ८२ हजार ६२४ झाली आहे.

इटलीत ७८ हजारांहून अधिक तर फ्रान्समध्ये ६७,८८५ जण कोरोनामुळे दगावले आहेत. स्पेनमध्ये कोरोना बळींची संख्या ५१ हजारांवर गेली असून जर्मनीने ४० हजारांचा टप्पा ओलांडल्याची माहिती स्थानिक यंत्रणेने दिली. या सर्व प्रमुख देशांमध्ये गेल्या महिन्यापासून ‘लॉकडाउन’ लागू करण्यात आला असून लसीकरणाची मोहिमही सुरू झाली आहे. मात्र त्यानंतरही कोरोनाची तीव्रता वाढत असल्याने तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. युरोपिय देशांव्यतिरिक्त रशिया व लॅटिन अमेरिकेतील ब्राझिलमध्येही साथीचा फैलाव वाढत असल्याचे समोर येत आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये २४ तासांमध्ये चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून देशातील रुग्णांची संख्या ३४ लाख, २५ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ६२ हजारांवर गेली आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत ८१ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून बळींची संख्या दोन लाखांवर गेली आहे. आफ्रिका खंडातील कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांहून अधिक झाली असून ७२ हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची माहिती ‘आफ्रिका सीडीसी’ने दिली आहे.

दरम्यान, चीनच्या हेबेई प्रांतात पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) पथक दाखल होत असतानाच रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply