आपण तिसऱ्या महायुद्धाच्या काळात जगत आहोत

- ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी भाविकांना संबोधित करताना, आपण सारे तिसऱ्या महायुद्धाच्या काळातून जात आहोत, असे बजावले आहे. याआधीही पोप फ्रान्सिस यांनी जगाला तिसऱ्या महायुद्धाची स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली होती.

1 सप्टेंबर 1939 रोजी दुसरे महायुद्ध पेटले होते. ‘त्याला 83 वर्षे होत असताना, या महायुद्धाच्या भयंकर अनुभवाच्या स्मृती आपल्याला पुढच्या आयुष्यात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांती विकसित करण्याची प्रेरणा देवो’, असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले. त्याचवेळी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा दाखला देऊन आजच्या घडीला तिसरे महायुद्ध टप्प्या टप्प्यांमध्ये खेळले जात आहे, असे सूचक उद्गार पोप फ्रान्सिस यांनी काढले आहेत.

बुधवारी भाविकांना संबोधित करताना पोप फ्रान्सिस यांनी 1 सप्टेंबर रोजी दुसरे महायुद्ध पेटले आणि त्याला 83 वर्षे पूर्ण होत आहेत, याची आठवण करून दिली. याबरोबरच सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा दाखला देऊन, तिसऱ्या महायुद्धाबाबत पोप फ्रान्सिस यांनी केलेली विधाने लक्ष वेधून घेत आहेत.

आपण सारे तिसऱ्या महायुद्धाच्या काळात जगत आहोत. सध्या हे तिसरे महायुद्ध टप्प्या टप्प्यांमध्ये सुरू आहे, असा दावा पोप फ्रान्सिस यांनी केला. याआधीही पोप फ्रान्सिस यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारी विधाने केली होती. तसेच युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबतही पोप फ्रान्सिस यांनी परखडपणे आपले विचार मांडले होते.

एप्रिल महिन्यात मानवता तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे सांगून पोप फ्रान्सिस यांनी हे महायुद्ध टाळता येण्याजोगे नसल्याचे बजावले होते. तर तिसऱ्या महायुद्धाची उद्घोषणा केव्हाच झालेली आहे, असे पोप फ्रान्सिस यांनी या वर्षाच्या जून महिन्यातच म्हटले होते.

तर युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, त्यावर पोप फ्रान्सिस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले होते. पण हे युद्ध सुरू होण्याच्याही आधी एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाने आपल्याला या युद्धाची आधीच कल्पना दिलेली होती, असे पोप फ्रान्सिस म्हणाले होते.

युक्रेनचे युद्ध अमेरिका व नाटोच्या आक्रमकतेमुळे पेटल्याचा ठपका पोप फ्रान्सिस यांनी जून महिन्यात ठेवला होता. त्याचे फार मोठे पडसाद उमटले होते. पोप फ्रान्सिस युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाला आरोपमुक्त करीत असल्याची टीका त्यावेळी झाली होती. तर काही दिवसांपूर्वी रशियोचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या निकटतम सहकाऱ्याच्या लेकीचा कारबॉम्ब स्फोटात मृत्यू झाला. त्यावर पोप फ्रान्सिस यांनी दुःख व्यक्त केले होते. युद्धात निरपराध असलेल्यांचा बळी जातो, असे पोप फ्रान्सिस म्हणाले होते. यावर युक्रेनच्या राजदूतांनी आक्षेप नोंदविला होता.

पोप फ्रान्सिस निष्पाप आणि युद्धाच्या गुन्हेगारांमध्ये घोळ घालत आहेत, असे युक्रेनच्या राजदूतांनी म्हटले होते. त्यावर व्हॅटिकनच्या प्रतिनिधींनी आदरणीय पोप यांच्या विधानांकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये, असा खुलासा दिला होता.

leave a reply