युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचे स्वागत करू

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांची घोषणा

वॉशिंग्टन – रशियाने युक्रेनचे युद्ध थांबवावे यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी प्रयत्न केल्यास अमेरिका त्याचे स्वागत करील, असे व्हाईट हाऊसच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान मोदी त्यांना आवश्यक वाटत असलेले निर्णय घेऊ शकतात, असेही जॉन किर्बी पुढे म्हणाले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला व त्यानंतर ते रशियाच्या भेटीवर गेले आणि त्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर, जॉन किर्बी यांनी केलेली विधाने भारतीय माध्यमांनी उचलून धरली आहेत.

US-politics-JEAN-PIERRE-BRIEFINGकाही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना ‘हा काळ युद्धाचा नाही’ असा सल्ला दिला होता. अमेरिका व युरोपिय देशांनी पंतप्रधान मोदी यांच्या या विधानाचे स्वागत केले. याचा दाखला देऊन भारताला देखील रशियाने छेडलेले हे युद्ध मान्य नाही, असा दावा या पाश्चिमात्य देश व माध्यमांनी केला होता. मात्र युक्रेनचे युद्ध थांबावे, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या भारताने सर्वच देशांच्या सुरक्षाविषयक चिंतेचे निराकरण करणे आवश्यक असल्याचेही ठासून सांगितले होते. याद्वारे रशियाला आपल्या सुरक्षेबाबत वाटत असलेली चिंता वैध ठरते, याची जाणीव भारताने करून दिली होती, त्याकडे अमेरिका व अमेरिकेचे सहकारी देश लक्ष्य द्यायला तयार नाहीत.

असे असले तरी युक्रेनचे युद्ध चिघळू नये, यासाठी रशियावर प्रभाव असलेला देश म्हणून भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, याची जाणीव अमेरिकेसह रशियाच्या विरोधात असलेल्या युरोपिय देशांनाही आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने देखील युक्रेनचे युद्ध सुरू असताना, काही ठिकाणी भारताच्या या प्रभावाचा उपयोग झाल्याचे मान्य केले होते. अशा परिस्थितीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अमेरिका, ब्रिटन व त्यानंतर केलेला रशियाचा दौरा लक्ष वेधून घेत आहे. रशियाच्या दौऱ्यात अजित डोवल यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचे तपशील उघड झालेले नाहीत. मात्र यामुळे युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारत नव्याने प्रयत्न करीत असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अशा परिस्थितीत जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारताच्या पंतप्रधानांनी युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न केलाच, तर आम्ही त्याचे स्वागत करू असे विधान केले आहे. मात्र या युद्धाला केवळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन जबाबदार असल्याचा ठपका ठेवून जॉन किर्बी यांनी त्यांनाच खलनायक ठरविले आहे. तसेच युक्रेनबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ युक्रेनलाच आहे, असे सांगून किर्बी यांनी युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनच्या शर्ती मानाव्या लागतील असे संकेत दिले आहेत.

हिंदी English

leave a reply