रशियाबरोबरील व्यापार थांबविण्यासाठी पाश्चिमात्यांचा युएईवर दबाव

- ब्रिटीश दैनिकाचा दावा

रशियाबरोबरील व्यापारवॉशिंग्टन/दुबई/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष उलटल्यानंतरही युक्रेनवरील रशियाचे प्रखर हल्ले अद्यापही सुरू आहेत. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर निर्बंधांचा या देशावर व युद्धावर विशेष परिणाम झाला नसल्याचे वारंवार समोर येत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता आता पाश्चिमात्य देशांनी रशियाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आखातातील आघाडीचा देश असणाऱ्या युएईवर दडपण टाकण्यात येत असून अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकताच या देशाचा दौरा केल्याचे उघड झाले. दौऱ्यात रशियावर टाकलेल्या निर्बंधांची जाणीव करून देत युएईने रशियाबरोबरील व्यापार कमी करावा, अशी समज देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

युक्रेन व युक्रेनला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे प्रचंड नुकसान होत असल्याची आकडेवारी सातत्याने प्रसिद्ध केली आहे. रशियाने जवळपास एक-तृतियांश लष्करी क्षमता गमावल्याचे दावेही करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही रशियन हल्ल्यांची धार कमी झालेली नाही. पाश्चिमात्य देश व सहकारी देशांनी टाकलेल्या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था तसेच संरक्षण उत्पादन यावर विशेष फरक पडल्याचे दिसून आलेले नाहीत. यामागे चीन, तुर्की, इराण, युएई, उत्तर कोरिया यासारख्या देशांकडून रशियाला पुरविण्यात येणारी संरक्षणसामुग्री हा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे आता पाश्चिमात्य देशांनी रशियाला सहकार्य करणाऱ्या या देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्याच महिन्यात जेम्स ओब्रायन (अमेरिका), डेव्हिड ओ सुलिव्हन (ईयू) व डेव्हिड रीड (ब्रिटन) या अधिकाऱ्यांसह पाश्चिमात्य शिष्टमंडळाने युएईला भेट दिली. या भेटीत शिष्टमंडळाने रशियावर लादलेले निर्बंध व त्याची अंमलबजावणी यासंदर्भात युएईच्या अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली. युएईकडून रशियाला काही संवेदनशील सामुग्री ‘रिएक्सपोर्ट’ करण्यात येत असून ही बाब समस्या निर्माण करणारी ठरते, अशी समज युएईला देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक ‘द फायनान्शिअल टाईम्स’ने हे वृत्त दिले आहे.

गेल्या वर्षी युएईने रशियाला 28.3 कोटी डॉलर्स मूल्याची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केल्याचे समोर आले आहे. यात मायक्रोचिप्स व ड्रोन्ससारख्या उत्पादनांचा समावेश आहे. काही धनाढ्य रशियन उद्योजक व प्रतिष्ठित नागरिकांकडून युएईचा वापर आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सेफ हेवन’ म्हणून करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. पाश्चिमात्य शिष्टमंडळांनी या सर्व बाबींकडे युएईच्या यंत्रणांचे लक्ष वेधले असून पुढील काळातही चर्चा सुरू राहील, असे संकेत दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत पार पडलेल्या एका कार्यक्रमात कोषागार विभागाच्या वरिष्ठ अधिकारी एलिझाबेथ रोसेनबर्ग यांनी रशिया व काही देशांमध्ये व्यापार संशयास्पदरित्या वाढल्याकडे लक्ष वेधले. युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या व निर्बंध टाकलेल्या रशियन कंपन्यांना पुरविण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या व्यापाराची बाब चिंताजनक आहे, असे रोसेनबर्ग यांनी बजावले. यावेळी त्यांनी युएईकडून रशियाला निर्यात केल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर डिव्हायसेसचा उल्लेख केला.

गेल्याच महिन्यात युएईमध्ये आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनातील रशियाचा स्टॉल प्रतिनिधींसह माध्यमांचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतूरोव्ह यांनी या काळात युएईचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी रशिया व युएईमधील वाढत्या व्यापाराचा उल्लेख केला होता. पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादलेले असतानाही रशिया-युएईमधील व्यापारी उलाढाल नऊ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे मांतूरोव्ह म्हणाले होते. दोन देशांमधील इंधनाव्यतिरिक्त उत्पादनांच्या व्यापारात तब्बल 57 टक्क्यांची वाढ झाल्याचेही समोर आले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता पाश्चिमात्य देशांकडून युएईवर टाकण्यात येणारे दडपण लक्ष वेधून घेणारी बाब ठरते.

leave a reply