पाश्चिमात्यांच्या ‘प्राईस कॅप’मुळे इंधनक्षेत्राचा विनाश होईल

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

इंधनक्षेत्राचा विनाशमॉस्को – ‘इंधनाच्या किंमतींवर लादलेली मर्यादा हा जागतिक इंधनक्षेत्राला विनाशाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. इंधनक्षेत्रात आधीच गुंतवणूक अपेक्षेपेक्षा कमी आहे. भविष्यात कधीतरी अशी वेळ येईल की हा उद्योग जगाला आवश्यक असणारी उत्पादनांची मागणी पूर्ण करु शकणार नाही. तसे झाले तर इंधनाचे दर गगनाला भिडतील. आजच्या घडीला जे देश किमतींवर मर्यादा घालत आहेत त्यांनाच याचा सर्वाधिक फटका बसल्याशिवाय राहणार नाही’, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. पुतिन हा इशारा देत असतानाच देशाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी पुढील वर्षापासून रशिया आपल्या इंधनउत्पादनात पाच ते सात टक्क्यांची कपात करेल, असे बजावले आहे.

इंधनक्षेत्राचा विनाशया महिन्याच्या सुरुवातीला रशियाकडून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींवर नियंत्रण घालतानाच सागरी क्षेत्रातून होणारी रशियन तेलाची आयात थांबविण्याचा निर्णय युरोपिय महासंघासह पाश्चिमात्य आघाडीने घेतला होता. रशियातून आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलासाठी ६० डॉलर्स प्रति बॅरल तर इंधनवायूसाठी १८० युरो मेगावॅट/प्रतितास अशी मर्यादा लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने याला जोरदार विरोध दर्शविला असून पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच, पाश्चिमात्यांनी लादलेल्या निर्बंधांना चकवा देण्यासाठी रशियाने १००हून अधिक तेलवाहू जहाजांचा ‘शॅडो फ्लीट’ तयार केल्याचे समोर आले.

इंधनक्षेत्राचा विनाशरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियन अर्थव्यवस्था व इंधनक्षेत्र खिळखिळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले. त्याचा काही अंशी फटका रशियाला बसला असला तरी इंधनक्षेत्र व अर्थव्यवस्था खिळखिळे करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळालेले नाही. अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांनी रशियन इंधनाची थेट आयात बंद केली आहे. मात्र यातील अनेक देश वेगवेगळ्या मार्गाने रशियन इंधनाची खरेदी करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

मात्र पुढील काळात रशियाचे धोरण अधिक आक्रमक असेल, असे संकेत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून मिळत आहेत. रशियन राष्ट्राध्यक्षांनी प्राईस कॅप हे बाजारपेठेच्या नियमांविरोधात उचललेले पाऊल असल्याचे बजावले. इंधन उत्पादकांवर दरांच्या बाबतीत चौकट लादण्याचा प्रयत्न होत असून रशियावरील प्राईस कॅप त्याची सुरुवात असल्याचा आरोपही पुतिन यांनी केला. दरांची मर्यादा म्हणजे वसाहतवादी मानसिकता असणाऱ्यांनी टाकलेला दरोडा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, रशिया २०२३ पासून आपल्या इंधन उत्पादनात प्रतिदिन पाच ते सात लाख बॅरल्सची कपात करील, असे संकेत उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी दिले आहेत. प्राईस कॅपची अंमलबजावणी करणाऱ्या देशांना कच्चे तेल व पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली जाणार नसल्याचा इशाराही नोवाक यांनी दिला.

leave a reply