देशातील गव्हाचे उत्पादन ११ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज

- कृषी मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – देशात गव्हाचे उत्पादन चालू पीक वर्षात ११ कोटी १३ लाख टनांच्या पुढे जाईल, अशी शक्यता कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे. याशिवाय तांदूळ, डाळी, तेल बियाणी आणि ऊसाच्या उत्पादनातही विक्रमी वाढीची शक्यता आहेे. यामुळे अन्नधान्याचे एकूण उत्पादन अंदाजे ३१ कोटी ६० लाख टनाच्या पुढे जाईल, असे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी गुरुवारी २०२१-२२ पीक वर्षातील (जुलै ते जुन) उत्पादनाचा अंदाज व्यक्त करणार्‍या दुसरा अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी यामध्ये शेतकर्‍यांची प्रचंड मेहनत, वैज्ञानिकांचे संशोधन आणि सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे तोमर म्हणाले.

दुसर्‍या सुधारीत अहवालात रब्बी पिकाचे उत्पादन विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. गहू हे देशातील प्रमुख रब्बी पिक आहे. गव्हाचे उत्पादन या पीक वर्षात १११.३१ दशलक्ष टनापर्यंत (११ कोटी १३ लाख १० हजार टन) पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली. २०२०-२१ सालात देशात गव्हाचे उत्पादन १० कोटी ९५ लाख ९० हजार टन इतके झाले होते.

तसेच डाळींचे उत्पादनही आतापर्यंतच्या सर्वोेच्च स्तरावर पोहोचेल असा दावा अहवालात करण्यात आला आहे. डाळींचे उत्पादन २ कोटी ६९ लाख ६० हजार टनावर पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून याआधीच्या वर्षात हेच उत्पादन २ कोटी ५४ लाख ६० हजार टन इतके होते. डाळींचे उत्पादन वाढल्याने देशाची डाळींच्या आयातीवरील निर्भरता आणखी घटेल.

तांदूळ उत्पादनही १२ कोटी ४३ लाख ७० हजार टनावरून १२ कोटी ७९ लाख ३० हजार टनावर जाईल. याशिवाय इतर भरड धान्यांचे उत्पादन ४ कोटी ९८ लाख ६० हजार टन होईल, असे अशी शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. देशाच्या अन्नधान्याच्या उत्पादनात गहू, तांदूळ, डाळी व इतर भरडधान्य प्रमुख आहेत. याशिवाय कृषी उत्पादनात तेल बियाणांचा वाटाही मोठा असतो. या पीकवर्षात तेल बियांचे उत्पादन ३ कोटी ७१ लाख ४० हजाराच्या विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मोहरीचे उत्पादनही १ कोटी १४ लाख टन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऊस आणि कापसाच्या उत्पादनही विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज अहवालातून वर्तवण्यात आला आहे. ऊस उत्पादन ४१ कोटी ४० लाख टन आणि कापूस उत्पादन ३ कोटी ४० लाख टनावर जाईल, असे अहवालात म्हटले आहे.

leave a reply