दिल्लीत आणखी एक आयईडी आढळल्याने खळबळ

- सुरक्षादलांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात दिल्लीच्या गाझिपूर फूल बाजारात शक्तीशाली आयईडी सापडला होता. त्यानंतर दिल्लीत गुरुवारी एका घरातून आणखी एक शक्तीशाली आयईडी जप्त करण्यात आला यामुळे खळबळ माजली आहे. दिल्लीच्या शहादामधील या इमारतीच्या घरातच हा आयईडी तयार करण्यात आला असावा असा संशय आहे. तसेच गाझिपूरमध्ये सापडलेल्या आयईडीशीही याचा संबंध असावा, असा शक्यता वर्तविली जाते.

दिल्लीच्या शहादा जिल्ह्यातील ओल्ड सीमापुरी भागात एका घरात संशयित बॅग पाहिल्याचा फोन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला आला होता. त्यानंतर तत्काळ दिल्ली पोलिसांचे अधिकारी, बॉम्ब शोधक व निकामी पथक, अग्नीशामक दलही घटनास्थळी पोहोचले. तसेच एनएसजीला पाचारण करण्यात आले. दुसर्‍या मजल्यावर या संशयित घराची झडती घेतली असता एक बॅग आढळून आली. त्याच्या तपासणीत बॅगेत आयईडी असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी सुमारे तीन किलो स्फोटके वापरण्यात आली असावीत असा अंदाज आहे.

याआधी जानेवारी महिन्यात गाझिपूरमध्ये सापडलेल्या बॅगेतील आयईडीमध्ये सुमारे साडेतीन किलो स्फोटके होते. यामध्ये अमोनियम नायट्रेट व आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. सीमापुरीमधील घरात सापडलेल्या बॅगेतील आयईडी त्याच पद्धतीचा असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. त्यामुळे गांभीर्य अधिक वाढले आहे.

घर मालकाला ताब्यात घेण्यात आले. मात्र हे घर भाड्याने देण्यात आले होते व यामध्ये तीन चार युवक राहत होती, अशी माहिती मिळत आहे. मात्र पोलीस येण्याआधी हे संशयित दहशतवादी फरार झाले. त्यामुळे आता व्यापक शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. गाझिपूर बॉम्बस्फोटाचा संबंध पाकिस्तानशी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तानातून भारतात २४ बॉम्बची तस्करी करण्यात आली होती. यातील एक आयईडी जम्मू-काश्मीरमध्ये निकामी करण्यात आला होता. गाझिपूरमधील आयईडी त्यामधील एक असल्याचा दावा अधिकार्‍यांच्या हवाल्याने वृत्तात करण्यात आला होता. त्यामुळे सीमापुरी सापडलेल्या आयईडीने तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

leave a reply