कॅनबेरा – ‘चीनला कधीही सॉलोमन आयलँड्सवर तळ उभारू देणार नाही’, अशी घोषणा सॉलोमनचे पंतप्रधान मनासेह सोगावरे यांनी केली. गेल्या काही महिन्यांपासून चीन सॉलोमन आयलँड्समध्ये लष्करी तळ उभारत असल्याच्या बातम्यांमुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. सॉलोमन बेटांवरील मधील चीनची ही तैनाती आपल्या सुरक्षेसाठी धोका ठरेल, अशी टीका ऑस्ट्रेलियाने केली होती. या पार्श्वभूमीवर सॉलोमन आयलँड्सच्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना आश्वस्त केले आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यासाठी चीनने गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रातील आपल्या राजनैतिक तसेच लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या क्षेत्रातील बेटदेशांची स्वतंत्र बैठक घेऊन कर्जाचे आमिष दाखविले होते. तर चीनच्या विनाशिका आणि गस्तीनौकांनी थेट ऑस्ट्रेलियापर्यंत धडक मारल्याचेही समोर आले होते.
यापैकी सॉलोमन आयलँड्स या ऑस्ट्रेलियाजवळच्या बेटदेशात चीनने गुंतवणूक वाढविण्यासाठी काही करार केले होते. सॉलोमन आयलँड्समध्ये चीनचे लष्करी तळ उभारण्याच्या कराराचा देखील यात समावेश असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाने केला होता. सॉलोमन आयलँड्सच्या किनारपट्टीपासून ऑस्ट्रेलिया दोन हजार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सॉलोमनवरील चीनचा तळ आपल्या सुरक्षेसाठी आव्हान असल्याची नाराजी ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली होती.
सॉलोमन आयलँड्सवर गुंतवणूक करताना चीनने ऑस्ट्रेलियाच्या रेड लाईन्सचे उल्लंघन करू नये. चीनने या बेटदेशावर लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न केलाच, तर सहकारी देशांचे सहाय्य घेऊन ऑस्ट्रेलिया चीनचे प्रयत्न हाणून पाडेल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिला होता. त्याचबरोबर सॉलोमन आयलँड्सने ऑस्ट्रेलिया व या क्षेत्रातील देशांबरोबर केलेल्या सहकार्याची आठवण मॉरिसन यांनी करुन दिली होती.
सॉलोमन आयलँड्सचे पंतप्रधान सोगावरे यांनी चीनला लष्करी तळ पुरविला नसल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी सॉलोमन आयलँड्सचा दौरा केला. चीनबरोबर सहकार्य प्रस्थापित केले असले तरी सॉलोमन आयलँड्सने लष्करी तळ पुरविलेला नाही, अशी माहिती पंतप्रधान सोगावरे यांनी पंतप्रधान अल्बानीज यांना दिली. चीनबरोबरच्या सहकार्याने सॉलोमन तसेच ‘पॅसिफिक आयलँड्स फोरम’मधील सदस्य देशांची सुरक्षा धोक्यात येणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान सोगावरे यांनी दिले.
दरम्यान, पॅसिफिक आयलँड्स फोरममध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सॉलोमन आयलँड्ससह 18 बेटदेशांचा समावेश आहे. 2003 ते 2017 या कालावधीत सॉलोमन आयलँड्समध्ये अस्थैर्य असताना याच पॅसिफिक देशांचे संयुक्त लष्कर व पोलीस दल तैनात करण्यात आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि सॉलोमनमध्ये सुरक्षा सहकार्य प्रस्थापित करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचे सॉलोमन आयलँड्सबरोबरील हे सहकार्य, या देशाने चीनशी केलेल्या करारामुळे धोक्यात आल्याचा दावा ऑस्ट्रेलियाने केला होता. पण सॉलोमन आयलँड्सच्या पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात चीनला लष्करी तळ उभारू देणार नसल्याचे सांगून आपल्या देशाची भूमिका बदललेली नाही, असा संदेश दिला आहे.