लडाखच्या एलएसीवरील गोग्रामधून चीनच्या लष्कराची माघार

नवी दिल्ली – १५ महिन्यांच्या तणावानंतर चीनच्या लष्कराने लडाखच्या एलएसीवरील गोग्रा येथून आपले जवान माघारी घेतले. ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान चीनच्या लष्कराने ही माघारीची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. भारतीय लष्कारनेही इथली तैनाती मागे घेतली आहे. दोन्ही देशांच्या लष्कराने सामंजस्याने परस्परांच्या माघारीची खातरजमा करून घेतल्याचे स्पष्ट केले. गोग्रामधील तणाव निवळला असला, तरी अजूनही लडाखच्या एलएसीवरील हॉट स्प्रिंग आणि डेप्सांगमधील तैनाती चीनने मागे घेतलेली नाही. तसेच गोग्रामधील या माघारीच्या बातम्या येत असताना, अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळ असलेल्या तिबेटच्या भागात चीनने बुलेट ट्रेनद्वारे जवान व संरक्षणसाहित्याची तैनाती केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

लडाखच्या एलएसीवरील गोग्रामधून चीनच्या लष्कराची माघारलडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेची १२वी फेरी नुकतीच पार पडली. यात गोग्रा येथून जवान माघारी घेण्याचे चीनने मान्य केले. यानुसार ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान चीनने आपले जवान माघारी घेतली. इथे चीनच्या लष्कराने उभे केलेले तात्पुरत्या स्वरुपाचे बांधकामही हटविण्यात आले आहे. त्याचवेळी भारताने देखील इथली तैनाती मागे घेतली. दोन्ही देशांच्या लष्कराने सामंजस्याने एकमेकांच्या माघारीची खातरजमा करून घेतल्याचे भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष उद्भवू शकणार्‍या आणखी एका संवेदनशील मुद्यावर सहमती झाल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले. तसेच पुढच्या काळात हॉट स्प्रिंग आणि डेप्सांगवर चर्चा होणार असल्याचे संकेत लष्कराने दिले आहेत.

दरम्यान, १५ महिन्यांच्या तणावानंतर चीनला लडाखच्या एलएसीवरून माघार घ्यावी लागत आहे, ही लक्षणीय बाब ठरते. घुसखोरीद्वारे एलएसीवर वर्चस्व गाजविण्याचा चीनचा प्रयत्न या देशावरच उलटल्यावाचून राहणार नाही, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी व विश्‍लेषक फार आधीपासून बजावत आले आहे. जितका काळ चीन लडाखच्या एलएसीवर तणाव माजविण्याचा प्रयत्न करील, तितक्या प्रमाणात चीनला मानहानी सहन करावी लागेल, असे माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे होते. अखेरीस काहीही हाती न लागता, चीनला नाईलाजाने तडजोड करून इथून माघार?घेण्यावाचून पर्यायच उरणार नाही, असा इशारा भारताच्या मुत्सद्यांनीही दिला होता. हा निष्कर्ष प्रत्यक्षात उतरत असल्याचे गोग्रा येथील चीनच्या माघारीवरून दिसू लागले आहे.

गोग्रा येथील या माघारीच्या बातम्या येत असल्या तरी चीनने भारताला चिथावणी देण्याचे प्रयत्न सोडून दिलेले नाही. अरुणाचल प्रदेशजवळच्या एलएसीजवळील तिबेटच्या भागात चीनने आपल्या जवान व लष्करी साहित्याची वाहतूक सुरू केली आहे. या वाहतुकीसाठी चीनने तिबेटची राजधानी ल्हासा ते निएंगचीमध्ये धावणार्‍या बुलेट ट्रेनचा वापर केला. याद्वारे भारतावर दडपण टाकण्याचा आणखी एक प्रयत्न चीन करीत असल्याचे उघड होत आहे.

leave a reply