मनाली आणि लेहमधील अंतर कमी करणाऱ्या ‘अटल टनेल’चे काम पूर्ण  

नवी दिल्ली –  मनाली आणि लेहमधील अंतर कमी करणारा ‘अटल टनेल’ तयार झाला आहे. जगातील सर्वात लांब आणि समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवर असलेल्या ‘अटल टनेल’ पीरपंजाल टेकड्यांमधून जातो. या भुयारी मार्गामुळे संघर्ष काळात कमी वेळेत लष्कराचे जवान आणि लष्करी साहित्याची वाहतूक चीन सीमेपर्यंत करता येईल. यामुळे या भुयारी मार्गाला फार मोठे सामरिक महत्व प्राप्त झाले आहे.

'अटल टनेल'

लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये कधीही जोरदार संघर्ष भडकेल, अशी स्थिती असताना सामरिकदृष्टया महत्वाच्या या टनेलचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधानांच्या हस्ते या टनेलचा उद्‌घाटन सोहळा पार पडणार आहे.

या भुयारी मार्गाची पायाभरणी झाली, त्यावेळी याला रोहतांग टनेल असे नाव देण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी दिवगंत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ ‘अटल टनेल’ असे नाव ठेवण्यात आले. काही तांत्रिक कारणामुळे या टनेलचे काम रखडले होते. गेल्या काही वर्षांपासून ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ चे(बीआरओ) इंजिनिअर्स आणि कामगार अथक मेहनत करुन आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करुन हा टनेल उभारत होते. उंचावर असल्यामुळे त्यांना या कामात बऱ्याच अडचणी आल्या.

'अटल टनेल'

कोरोनाव्हायरसमुळे फक्त दहा दिवस या टनेलचे काम थांबले होते. त्यानंतर ‘बीआरओ’ने केंद्र सरकारची विशेष परवानगी घेऊन कामाला सुरुवात केली. सप्टेंबरमध्ये हा टनेल बांधून तयार झाला. हा टनेल पूर्ण होण्यास जवळपास दहा वर्षे लागली. या टनेलची लांबी ८.८२ किलोमीटर इतकी आहे.

दिवसाला तीन हजार वाहने या टनेलमधून प्रवास करु शकतात.  प्रत्येक ५०० मीटर अंतरावर इमर्जन्सी एक्झिट आहे. तसेच प्रत्येक ६० मीटर अंतरावर सीसीटीव्ही आहेत. तसेच आत फायर सिस्टीम्स बसविण्यात आल्या आहेत.  या टनेलसाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.   मुख्य म्हणजे हे टनेल बाराही महिने अगदी प्रतिकूल हवामानातही वापरता येईल. हिवाळा सुरु झाल्यावर रोहतांग पास सहा महिने बंद असतो. पण आता अटल टनेलमुळे पर्यायी मार्ग उपल्बध झाला आहे.

leave a reply