चीनने रशियाची बाजू घेतल्यास तिसरे महायुद्ध भडकेल

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा इशारा

Russian Foreign Minister Sergei Lavrov and Chinese Foreign Minister Wang Yi meet in Denpasarकिव्ह/बीजिंग/मॉस्को – ‘रशिया-युक्रेन युद्धात चीनने रशियाचे समर्थन न करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चीनने युक्रेनच्या बाजूने असणे आपल्याला आवडेल. पण सध्याच्या काळात हे शक्य आहे, असे वाटत नाही. सध्या युद्धात नक्की काय घडते आहे याबद्दल योग्य मूल्यमापन करण्याची एक संधी चीनकडे आहे. कारण चीनने जर रशियाशी युती केली तर त्यातून तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो आणि चीनला याची जाणीव आहे, असे मला वाटते’, या शब्दात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत बजावले आहे.

चीनने रशिया-युक्रेन युद्धात उघडपणे कोणाचीही बाजू घेतलेली नाही. मात्र चीन छुप्या मार्गाने रशियाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत असल्याचे दावे पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांकडून केले जातात. रशिया-युक्रेन युद्धात पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. चीनने या निर्बंधांना विरोध करीत रशियावरोबरील व्यापारी सहकार्य व इतर क्षेत्रांमधील व्यवहार अधिकच वाढविल्याचे समोर येत आहे. यात इंधनआयातीचाही समावेश आहे. चीनची रशियन इंधनाची आयात विक्रमी स्तरावर पोहोचल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे.

thediplomat-chinas-growing-high-end-militaryयाव्यतिरिक्त चिनी कंपन्या रशियाला सेमीकंडक्टर्स, ड्रोन्स, सॅटेलाईट फोटोग्राफ्स यासह इतर तांत्रिक सहकार्य मोठ्या प्रमाणात पुरवित आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशिया व चीनच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी परस्परांच्या मोठ्या प्रमाणात भेटी घेतल्या आहेत. युक्रेनवर हल्ला चढविण्यापूर्वीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सही पार पडली होती. यात दोन देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर पोहोचल्याची वक्तव्येही करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन युक्रेन भेटीवर असताना चीनचे परराष्ट्र सल्लागार वँग यी रशियात दाखल झाले आहेत. ही बाबदेखील लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

युरोपात सुरू असलेल्या म्युनिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, चीन रशियाला घातक व प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्यास सुरुवात करु शकतो, असा इशारा दिला होता. याचे गंभीर परिणाम चीनला भोगावे लागतील, असेही बजावले होते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

leave a reply