इस्रायलने सौदी अरेबियाबरोबरील लष्करी सहकार्यासाठी हालचाली वाढविल्या

- अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावा

वॉशिंग्टन – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदी अरेबियाबरोबर लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. इराणपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, इस्रायल व सौदीमध्ये हे सहकार्य विकसित हेोत असल्याचा दावा ‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकी वृत्तसंस्थेने केला. येत्या काही दिवसात प्राग येथे इस्रायल व सौदीच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा पार पडू शकते, अशी माहिती ‘ब्लूमबर्ग’ने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

महिन्याभरापूर्वी इस्रायलमध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अब्राहम करारामध्ये सौदी अरेबियाला सामील करून घेण्याचे जाहीर केले होते. इस्रायलमधील वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नेत्यान्याहू यांनी हा दावा केला होता. पण गेल्या महिन्याभरात इस्रायलच्या पंतप्रधानांकडून सदर सहकार्याबाबत विशेष हालचाल दिसली नव्हती. पण इस्रायल व सौदीमधील सहकार्यासाठी बायडेन प्रशासनाने मध्यस्थाची भूमिका स्वीकारल्याचा दावा ब्ल्यूमबर्गने केला आहे.

जानेवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी इस्रायलचा दौरा करून पंतप्रधान नेत्यान्याहू यांची भेट घेतली होती. याच भेटीत अब्राहम करारात सौदीला सामील करून घेण्यावर चर्चा पार पडली होती. या करारात सौदी सहभागी झाला तर या क्षेत्रातील शांततेच्या कक्षा रुंदावतील, असा विश्वास इस्रायलच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. इराणचा अणुकार्यक्रम आणि दहशतवादी संघटनांना रोखण्यासाठी सौदीबरोबरील सहकार्य महत्त्वाचे ठरेल, असे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला. या दौऱ्यात अमेरिकन अधिकाऱ्यांनी ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’च्या सदस्य देशांची भेट घेतली. तर सौदीबरोबरच्या बैठकीत इस्रायलबरोबरच्या सहकार्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा केला जातो. पण पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटल्याखेरीज सौदी इस्रायलबरोबर राजकीय सहकार्य प्रस्थापित करू शकत नसल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. असे असले तरी इराणविरोधी आघाडीसाठी सौदीबरोबर लष्करी तसेच गोपनीय माहितीच्या आदानप्रदानाबाबत सहकार्य प्रस्थापित करण्याची तयारी इस्रायलने दाखविली आहे.

अमेरिकी वृत्तसंस्थेने या घडामोडींशी निगडीत असलेल्या आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली. लवकरच इस्रायल व सौदीच्या प्रतिनिधींमध्ये युरोपमधील झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे विशेष बैठक पार पडणार आहे. तर जर्मनीच्या म्युनिकमध्ये सुरक्षाविषयक बैठक सुरू आहे. या बैठकीत सौदीच्या नेत्यांनी पॅलेस्टिनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत, प्राग येथे इस्रायल व सौदीच्या प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या चर्चेकडे विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे.

याआधी इस्रायल व सौदीच्या अधिकाऱ्यांच्या अमेरिका तसेच युरोपिय देशांमध्ये छुप्या बैठका पार पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर २०२० साली इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी गोपनीयरित्या सौदीच्या निओम शहराचा प्रवास करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतल्याचे दावे करण्यात आले होते. तर सौदीच्या सहमतीनंतरच युएई व बाहरिनने इस्रायलबरोबर अब्राहम करार केल्याची चर्चा झाली होती. अशा परिस्थितीत, इराणच्या विरोधात इस्रायल व सौदीमधील लष्करी सहकार्यावर सुरू असलेली चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

leave a reply