‘लॅब लीक’च्या आरोपाने अस्वस्थ झालेल्या चीनची भारतीय माध्यमांवर आगपाखड

बीजिंग – जगभरात पसरलेली कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्ध असल्याचा पाश्‍चिमात्यांचा ‘लॅब लीक’चा आरोप भारतीय माध्यमांनी उचलून धरला आहे. याने चीनची अस्वस्थता वाढली आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारतीय माध्यमे चीनवर निराधार आरोप करीत असल्याची टीका केली. चीनवर असे आरोप करण्यापेक्षा भारतीय माध्यमांनी अमेरिकन लष्कराच्या जैविक शस्त्रांवर प्रश्‍न उपस्थित करावे व याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करावी, असा सल्ला ग्लोबल टाईम्सने दिला आहे.

‘लॅब लीक’जगात हाहाकार माजविणार्‍या जैविक शस्त्राचा वापर करण्याची योजना २०१५ सालीच चीनने तयार केली होती, असे सिद्ध करणारी काही कागदपत्रे जगासमोर आली आहेत. त्याचवेळी चीनच्या वुहानमधील ज्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू बाहेर पडला, त्याबाबतची माहिती चीन दडपून टाकत आहे. याबाबत चीनकडून केल्या जाणार्‍या सारवासारवीचे प्रयत्नही आता जगजाहीर झाले आहेत. अमेरिकेत आश्रय घेतलेल्या चीनच्या संशोधिका डॉ. ली-मेंग यान यांनी कोरोनाबाबतचे भयंकर तपशील उघड करून चीनचा पर्दाफाश केला आहे. या संशोधिकेच्या मुलाखती भारतीय वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केल्या जात आहेत.

भारताचे माजी लष्करी अधिकारी आता उघडपणे कोरोनाच्या फैलावामागे चीन असल्याचा संशय उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. भारताच्या विशिष्ट भूभागातच कोरोनाची साथ आकस्मिकपणे वाढत आहे आणि कुणीतरी नियंत्रित केल्यासारखे त्याचा प्रभाव भारताच्या सीमेपलिकडे पडत नाही, ही लक्षणीय बाब ठरते. त्यामुळे कोरोनाची साथ हे भारताला रोखण्यासाठी पुकारलेले जैविक युद्ध असावे, या संशयाला पुष्टी मिळते, असे माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

भारतीय माध्यमांमध्ये यासंदर्भात येणारे वृत्तांत व दाव्यांबाबत चीन अतिशय संवेदनशीलता दाखवित आहे. चीनच्या कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारतीय माध्यमांचे हे आरोप निराधार असल्याचा ठपका ठेवला. इतकेच नाही तर भारतीय माध्यमांमधला गट आपले सरकार व यंत्रणांच्या अपयशाकडून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चीनला लक्ष्य करीत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्सने केला.

‘लॅब लीक’जागतिक आरोग्य संघटनेने चीनवरील आरोप अमान्य केले आहेत. त्यामुळे ‘लॅब लीक’ अर्थात चीनच्या वुहान लॅबमधून कोरोनाची साथ पसरली हा आरोप निराधार असल्याचे उघड झाले आहे. असे असतानाही याबाबत चीनवर केले जाणारे आरोप तथ्यहीन ठरतात, असा बचाव चीनच्या या सरकारी वर्तमानपत्राने केला. तसेच याबाबत चीनवर आरोप करण्यापेक्षा भारतीय माध्यमांनी अमेरिकेला प्रश्‍न करावे, असा सल्ला ग्लोबल टाईम्सने दिला. अमेरिकन लष्कराच्या सुमारे २०० हून अधिक जैविक प्रयोगशाळा दुसर्‍या देशात सक्रीय आहेत. त्यामुळे चीनवर आरोप करण्यापेक्षा भारतीय माध्यमांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करावी, असे ग्लोबल टाईम्सने सुचविले आहे.

चीनने भारताला उदार मनाने कोरोनाविरोधी लढ्यात सहाय्य पुरविले. पण भारतीय माध्यमांनी या सहाय्याची तैवानकडून केल्या जाणार्‍या सहाय्याशी तुलना केली. या निमित्ताने चीनच्या विरोधात ‘तैवान कार्ड’ वापरण्याचा डाव भारतीय माध्यमे खेळत आहेत, अशी नाराजी ग्लोबल टाईम्सने व्यक्त केली. मात्र चीनच्या मुखपत्राकडून भारतीय माध्यमांवर केली जाणारी टीका व आपल्या देशाचा बचाव ही अपेक्षितच बाब ठरते. जैविक युद्धाच्या आरोपामुळे चीन सध्या अस्वस्थ झाला आहे. आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा यामुळे धोक्यात आलेली आहे, याचीही चीनला जाणीव झाली आहे.

अमेरिकेचे बायडेन प्रशासन चीनधार्जिणे असले तरी चीनच्या विरोधात अमेरिकेत धुमसत असलेल्या असंतोषामुळे बायडेन यांच्या प्रशासनालाही चीनच्या विरोधात पावले उचलावी लागत आहेत. इतकेच नाही तर युरोपिय महासंघाने देखील चीनबरोबरील व्यापार व गुंतवणूकविषयक करार गुंडाळून ठेवला आहे. जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडू लागल्या आहेत. जपान व ऑस्ट्रेलिया उत्पादनाचे पर्यायी केंद्र भारतात विकसित व्हावे, यासाठी सहकार्य करीत आहेत. अशा परिस्थितीत चीन आपली मलिन झालेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाविरोधी लढ्यासाठी गरीब देशांना तीन अब्ज डॉलर्सचे सहकार्य देण्याची तयारी केली आहे. हा सारा चीनच्या सारवासारवीच्या प्रयत्नांचा भाग ठरतो.

leave a reply