‘कोरोना २’च्या भीतीने वुहानमधील जनतेचा वैद्यकीय चाचणीला विरोध

वुहान – कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असणाऱ्या चीनच्या वुहान शहरात या साथीची दुसरी लाट आली असून रविवारी येथे १७ नवे कोरोनाबाधित आढळले. या साथीचा फैलाव रोखण्यासाठी चीनने वुहान शहरातील जनतेची वैद्यकीय फेरचाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. पण या चाचणीमुळे आपल्याला पुन्हा कोरोना होईल, या भीतीने वुहानच्या जनतेला ग्रासले आहे. म्हणूनच वुहानच्या जनतेने या चाचणीला कडाडून विरोध सुरू केला आहे.

गेल्या आठवड्याभरात वुहान तसेच चीनच्या इतर शहरांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडू लागले आहेत. वुहान शहरातील या रुग्णांची नोंद संख्या ४०च्यावर पोहोचली आहे. यामुळे या साथीचा उगम झालेल्या वुहानमध्येच याची दुसरी लाट परतल्याचा दावा जोर पकडू लागला आहे. त्याचबरोबर चीन पुन्हा एकदा जगापासून याबाबत लपवाछपवी करीत असल्याचा आरोपही तीव्र होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने वुहान शहरातील एक कोटी दहा लाख नागरिकांची फेरचाचणी घेण्याचे जाहीर केले असून १५ लाख जणांची चाचणी झाल्याचाही दावा केला आहे.

पण वुहानमधील जनता चीन सरकारच्या या फेरचाचणीच्या निर्णयाने घाबरली आहे. सोशल मीडियावर वुहानच्या जनतेला वाटत असलेली भीती व्यक्त होऊ लागली आहे. फेरचाचणी घेत असताना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असल्याचे सांगून या नागरिकांनी चीन सरकारकडून वैद्यकीय सुविधांबाबत केले जाणारे दावे खोटे ठरवले आहेत. तसेच या चाचणीच्या विश्वासार्हतेवर काहींनी शंका उपस्थित केली आहे. त्याचबरोबर वुहानमध्ये आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक वैद्यकीय यंत्रणेने स्पष्ट केले.

तसेच वुहानमध्ये आढळलेले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्ण स्थानिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वुहानमध्ये सापडलेले नवे रुग्ण बाहेरच्या देशातून आल्याचे चीनचे दावे निकालात निघाले आहेत. सध्या एकट्या वुहानमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले ४० तर, लक्षणे नसलेले कोरोनाचे १९४ रुग्ण आहेत. वुहानमधील या स्थितीबाबत पाश्चिमात्य माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या या बातमीवर चीनने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

दरम्यान, चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच ही साथ आल्याचे पुरावे अमेरिकेकडे असल्याचे जाहीर करून अमेरिकेने चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. या साथीला जबाबदार असलेल्या चीनकडून जबरदस्त नुकसानभरपाई वसूल केल्याखेरीज अमेरिका व अमेरिकेचे मित्रदेश स्वस्थ बसणार नाहीत, असा दावा जगभरातील विश्लेषक करीत आहेत. अशा परिस्थितीत वुहानमधील कोरोनाची दुसरी लाट चीनसमोरील आव्हानात नवी भर टाकत असल्याचे दिसत आहे.

leave a reply