येमेनी लष्कराच्या हल्ल्यात 140 हौथी बंडखोर ठार

- सौदीने हौथींचा ड्रोन हल्ल्याचा कट उधळला

सना/अल मुकाल्ला – येमेनच्या मरिब प्रांतात लष्कराने केलेल्या कारवाईत गेल्या 48 तासात इराणसंलग्न हौथी संघटनेच्या किमान 140 बंडखोरांना ठार केले. येमेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. चार दिवसांपूर्वी हौथी बंडखोरांनी येमेनच्या हवाईतळावर हल्ले चढविले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल येमेनी लष्कराने ही कारवाई केली. दरम्यान, सौदी अरेबियाच्या आणखी एका हवाईतळावर आत्मघाती ड्रोनने हल्ला चढविण्याचा हौथी बंडखोरांचा कट सौदीने उधळला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनसंपन्न असलेल्या मरिबचा प्रांताचा पूर्ण ताबा घेण्यासाठी हौथी बंडखोरांचे प्रयत्न सुरू आहेत. मरिबचा ताबा मिळाला तर हौथी बंडखोरांची आर्थिक चणचण सुटणार असल्याचा दावा केला जातो. कारण मरिबमध्ये इंधनाचा मोठा साठा असून येमेनच्या अर्थव्यवस्थेत याचे मोठे महत्त्व आहे. म्हणून हौथी बंडखोरांचे मरिबवर हल्ले सुरू असतात. गेल्या पाच दिवसांपासून इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी मरिबवर नवे हल्ले सुरू केले असून येमेनच्या लष्कराकडून त्यांना सडेतोड उत्तर दिले जात आहे.

चार दिवसांपूर्वी हौथी बंडखोरांनी दक्षिणेकडील हवाईतळावर हल्ले चढवून येमेनच्या सरकारला मोठा हादरा देण्याचा प्रयत्न केला. हौथी बंडखोर या प्रयत्नात फसले. पण त्यानंतर येमेनच्या लष्कराने गेल्या 48 तासात हौथींवर जोरदार हल्ले चढविले. यामध्ये किमान 140 बंडखोर ठार केल्याची माहिती येमेनच्या लष्कराने दिली. येमेनच्या लष्कराने हवाई हल्ले चढवून या 140 बंडखोरांना ठार केल्याचे बोलले जाते.

गेल्या पाच वर्षांपासून येमेनमध्ये सरकार विरोधात हौथी असे गृहयुद्ध पेटले आहे. सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांचे समर्थन असलेले येमेनचे राष्ट्राध्यक्ष अबेद मन्सूर हादी यांनी इराणसंलग्न हौथी बंडखोरांचा संघर्ष हाणून पाडण्याची घोषणा केली आहे. हौथींना शस्त्रसज्ज करून इराण येमेनच्या अंतर्गत मुद्यांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष हादी यांनी केला होता. इराण हौथी बंडखोरांचा वापर करून येमेनला अस्थिर करीत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष हादी व सौदीने ठेवला होता.

इराणने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण हौथी बंडखोरांनी येमेनचे लष्कर तसेच सौदीवर हल्ल्यांसाठी वापरलेले ड्रोन्स, क्षेपणास्त्रे इराणी बनावटीचे असल्याचे उघड झाले होते. याशिवाय सौदी व युएईने रेड सी आणि एडनच्या आखातात इराणकडून हौथी बंडखोरांना होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी पकडली होती. सौदीच्या अतिपूर्वेकडील शहरांवर ड्रोन हल्ले चढविण्याची क्षमता व तंत्रज्ञान हौथींकडे नसून इराणच त्यांना शस्त्रसज्ज करीत असल्याचे सौदीने लक्षात आणून दिले होते.

दरम्यान, सौदीच्या खामिस मशयत शहरावर ड्रोन हल्ला चढविण्याचा हौथी बंडखोरांचा डाव सौदीने हाणून पाडला. स्फोटकांनी सज्ज ड्रोनद्वारे आत्मघाती हल्ल्यासारखा वापर करण्याची हौथींची योजना होती. पण सौदीच्या लष्कराने हा ड्रोन हल्ला हाणून पाडला. चार दिवसांपूर्वी हौथींनी सौदीच्या आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ जण जखमी झाले होते. तसेच सौदीच्या प्रवासी विमानाचे नुकसान झाले होते.

leave a reply