2015च्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या शंभरहून अधिक प्रकल्पांच्या पुनर्उभारणीकरिता नेपाळचा भारताबरोबर करार

काठमांडू – नेपाळमध्ये कम्युनिस्ट सरकार बदलल्यावर भारत आणि नेपाळमध्ये ताणले गेलेले संबंध सामान्य होऊ लागले आहेत. भारत आणि नेपाळमध्ये एक महत्त्वाचा करार संपन्न झाला असून याअंतर्गत भारत नेपाळमध्ये शंभरहून अधिक प्रकल्पांची पुनर्बांधणी करून देणार आहे. 2015 साली आलेल्या भीषण भूकंपात मोठे नुकसान झाले होते. यातील 14 या पुरातन वास्तू आहेत. प्रकल्पांच्या पुनर्उभरणीसंदर्भात शुक्रवारी भारत आणि नेपाळमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेपाळमधील भारताच्या दूतावासामध्ये आणि नेपाळच्या ‘सेंट्रल लेव्हल प्रोजेक्ट इम्लिमेंटेशन युनिट ऑफ रिक्नस्ट्रक्शन ऑथॉरिटी’मध्ये हा करार पार पडला आहे.

2015 साली नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड मोठ्या भूकंपात नेपाळमध्ये हाहाकार उडाला होता. यामध्ये 9 हजार जणांचा बळी गेला होता. तर कित्येक प्राचीन वास्तू, धार्मिक स्थळांबरोबर विविध प्रकल्पांचे नुकसान झाले होते. तसेच 8 लाखाहून अधिक घरे व इमारती कोसळल्या होत्या. या संकटात नेपाळला सर्वात प्रथम सहाय्य भारताने पुरविले होते. तसेच नेपाळमध्ये मोठी बचाव मोहीम भारताने राबविली होती व तातडीची आर्थिक मदतही केली होती.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी व नेपाळला पुन्हा उभे करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळला दिली होती. त्यानुसार भारताने घरे, इमारतींच्या उभारणीसह नेपाळला मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आणखी काही प्रकल्पांची पुनर्बांधणी भारत नेपाळला करून देणार आहे.

भारत नेपाळमध्ये पार पडलेल्या सामजंस्य करारानुसार ललितपूर, नवाकोट, रासूवा, धंदिंगमधील भारत 14 पुरातन सांस्कृतीक वास्तूंची पुनर्बांधणी करणार आहे. याशिवाय ललितपूर, रासूवा, नवाकोट, सिंधुपलचौक, रामेछप, डोलखा, गुलमी, गोरखा, आणि कावरे जिल्ह्यात 103 आरोग्य प्रकल्पांची बांधणीही भारत करणार आहे. यासाठी 420 कोटी नेपाळी रुपये इतका खर्च येणार आहे.

2015च्या भूकंपानंतर भारताने नेपाळला 25 कोटी डॉलर्सचे तातडीचे सहाय्य केले होते. यातून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य सुविधा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार होती. तर 10 कोटी डॉलर्सचे सहाय्य हे कोसळलेल्या घरांच्या पुनर्बांधणीकरीता करण्यात आले होते. याअंतर्गत 71 शैक्षणिक प्रकल्प, 28 पुरातन वास्तू प्रकल्प, 147 आरोग्य प्रकल्प आणि 50 हजार घरांची उभारणी सुरू आहे.

नेपाळमधून के. पी. ओली पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर सत्तेत आलेल्या नेपाळ काँग्रेसच्या संयुक्त आघाडी सरकारने पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या नेतृत्त्वाखाली भारताबरोबर संबंध पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीन नेपाळचा चांगला मित्र असला, तरी भारताची मैत्री विशेष आहे. चीन भारताची कधीच जागा घेऊ शकत नाही, असे काही दिवसांपूर्वीच नेपाळ काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले होते. तसेच भारताबरोबर सीमावाद हा चर्चेच्या माध्यमातून सोडवू अशी स्पष्ट भूमीका सध्याच्या नेपाळ सरकारने स्वीकारली आहे.

leave a reply