भंडारामधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

नागपूर – महाराष्ट्रातील भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयात अग्नीसुरक्षा यंत्रणा नव्हती. तसेच शिशू केअर युनिटमध्ये बालकांजवळ कोणताही परिचारक उपस्थित नव्हता, असा दावा करण्यात येत आहे. राज्य सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशु केअर युनिटला आग लागली. ही आग शॉर्ट सक्रिटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या दुर्घटनेसाठी प्रचंड निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. नवजात बालकांना ठेवण्यात येणार्‍या या वॉर्डमध्ये कोणताही परिचारक उपस्थित नसल्याने आगीने भीषण रूप घेईपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही, असा दावा करण्यात येतो. तर काही वृत्तात दोन परिचारिका आणि वॉर्डबॉय वॉर्डमध्ये होते व आग लागल्याचे कळताच त्यांनी दहा बालकांना येथून हलविले, तसेच शेजारील वॉर्डही रिकामा केला, अशी माहिती देण्यात येत आहे.

या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालकांना ठेवण्यात आले होते. यातील सात बालकांना वाचविण्यात यश आले असून १० नवजातांचा मृत्यू झाला आहे. यातील काही बालकांचा नुकताच जन्म झाला होता. तर काही बालके दोन ते तीन महिन्यांची होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भंडार्‍यात दाखल झाले आहेत. दरम्यान, भंडारा रुग्णालयाच्या आगीच्या दुघर्टनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालिकेच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहेे. ही समिती आगीचे कारण, रुग्णालयाचे ऑडिट याची चौकशी करणार आहे.

दुर्घटनेदरम्यान हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे वृत्त आहे. चौकशीदरम्यान ही माहिती समोर येईल. तीन दिवसात ही समिती चौकशीचा अहवाल यंत्रणेेकडे सादर करील. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली. या आगीत बळी गेलेल्या बालकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

leave a reply