अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा बळी

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत 10 जणांचा बळी गेला असून तीन जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी बफेलो भागातील टॉप्स सुपरमार्केटमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर पेटन जेन्ड्रॉन 18 वर्षाचा तरुण आहे. वर्णवर्चस्ववादी विचारसरणीच्या प्रभावाखाली त्याने हा गोळीबार घडविल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यावर तीव्र शोक व्यक्त केला असून हे घृणास्पद कृत्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा बळीशनिवारी दुपारी 18 वर्षीय पेटनने लष्करी गणवेशात बफेलोमधील ‘टॉप्स सुपरमार्केट’मध्ये प्रवेश करीत गोळीबार सुरू केला. गोळीबार करताना त्याच्या अंगात चिलखत तसेच डोक्यावर हेल्मेट घातले होते. गोळीबार करताना पेटनने कॅमेऱ्याच्या सहाय्याने संपूर्ण घटनेचे ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ केल्याचे उघड झाले आहे. ‘ट्विच’ या सोशल मीडिया साईटवर ही घटना दाखविण्यात आल्याचे समोर आले. यावरून झालेल्या गदारोळानंतर सदर कंपनीने पेटन याच्या गोळीबाराचा व्हिडिओ काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा बळीगोळीबारात सुपरमार्केटमध्ये आलेल्या नऊ ग्राहकांसह सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. हा हल्ला वर्णद्वेषातून झाल्याचे समोर येत आहे. पेटन याने 180 पानांचा ‘मॅनिफेस्टो’ तयार केला होता. त्यात कृष्णवर्णिय तसेच इस्लामधर्मियांविरोधात टीका करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ब्रेंटन टॅरन्ट आपला आदर्श असल्याचा उल्लेख पेटनने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये केला होता.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा बळीगेल्या वर्षी आपल्या शाळेतील मित्रांबरोबर बोलताना त्याने ‘मास शूटिंग’ घडविण्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर झालेल्या तपासात त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे आढळले होते. त्याला मानसोपचाराचा सल्लाही देण्यात आला होता.

अमेरिकेत गेल्या काही महिन्यात अनेक मोठ्या व महत्त्वाच्या शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कच्या मेट्रो रेल्वे स्टेशन भागात एका व्यक्तीने चाकूहल्ला करून अनेकांना जखमी केल्याची घटनाही समोर आली होती. न्यूयॉर्कच्या सुरक्षेसाठी योग्य प्रमाणात पोलीस उपलब्ध नसल्याचेही उघड झाले आहे. यावरून स्थानिकांनी डेमोक्रॅट पक्ष व प्रशासनाला धारेवर धरले असले तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येते.

leave a reply