अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनाव्हायरसचे दहा हजार बळी

वॉशिंग्टन/लंडन – गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे १५१४ जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत या साथीने आत्तापर्यंत २२,८५१ जण दगावले असून एकट्या न्यूयॉर्क प्रांतात दहा हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, या साथीमुळे जगभरात १,१७,५३७ जणांनी प्राण गमावले तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या १९ लाखांवर गेली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतात गेल्या चोवीस तासात ६७१ जणांचा बळी गेला असून येथील कोरोनाबाधितांची संख्या १,८९,०२० वर गेली आहे. अमेरिकेत या साथीचे ५,६४,३३२ रुग्ण असून दररोज तीस हजाराहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. न्यूयॉर्कमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे.

या साथीने ब्रिटनमध्ये चोवीस तासात ७१७ जण दगावले असून ब्रिटनमधील बळींची संख्या अकरा हजारावर पोहोचली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ब्रिटन लॉकडाउनमध्ये आहे. हे लॉकडाउन यापुढेही सुरू ठेवायचे का, यावर येत्या गुरुवारी चर्चा होणार आहे.

फ्रान्समध्ये रविवारी सहाशेहून अधिक जणांचा बळी गेला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन येत्या काही तासात फ्रान्सच्या जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी मक्रॉन देशातील लॉकडाउन यापुढेही सुरू ठेवणार असल्याची घोषणा करू शकतात, असे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. या साथीने युरोपिय देशांमध्ये ७९ हजार जणांचा बळी घेतला आहे.

दरम्यान, रशियामध्ये या साथीमुळे १४८ जण दगावले आहेत. इतर देशांच्या तुलनेत रशियामध्ये या साथीने कमी हानी झाली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून रशियामध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी रशियात २५५८ नवे रुग्ण आढळले. तुर्कीतही या साथीने १२९६ जणांचा बळी घेतला असून ६१ हजाराहून अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे.

leave a reply