सिरियातील रशियाच्या हवाई हल्ल्यात 120 दहशतवादी ठार

- अल कायदा संलग्न संघटनेच्या मोठा नेत्याचा समावेश

हल्ल्यात 120दमास्कस – रशियाच्या लढाऊ विमानांनी सिरियातील अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर चढविलेल्या हल्ल्यात 120 दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये ‘कतिबा अल-तवहीद वल-जिहाद’ या संघटनेचा प्रमुख मारला गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर रशियाच्या या हल्ल्यात सात नागरिकांचा बळी गेल्याची टीका ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केली. दरम्यान, आत्तापर्यंत युक्रेनमधील युद्धात गुंतलेल्या रशियाने या हल्ल्यासह सिरियातील घडामोडींकडे लक्ष वळविल्याचा दावा केला जातो.

सिरियाच्या वायव्येकडील इदलिब प्रांतात अल कायदासंलग्न अल-नुस्र फ्रंट या संघटनेचे वर्चस्व आहे. तुर्कीच्या सीमेला भिडलेल्या या प्रांतात अल-नुस्रसह अल कायदाशी जोडलेल्या छोट्या दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढत असल्याची चिंता सिरियाने याआधी व्यक्त केली होती. याच इदलिब प्रांतातील शैख युसेफ भागात रशियाच्या लढाऊ विमानांनी गुरुवारी किमान 14 क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. यामध्ये अल-नुस्र व इतर दहशतवादी गटांच्या चौक्या, छुपे तळ, ड्रोन्स आणि रॉकेट लाँचर्स उद्ध्वस्त झाल्याची माहिती ‘सना’ या सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली.

या हल्ल्यात अल कायदा संलग्न नुस्र गटाचे एकूण 120 दहशतवादी ठार झाले असून यामध्ये 20 हून अधिक कमांडर्सचा समावेश असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर ‘कतिबा अल-तवहीद वल-जिहाद’ या आणखी एका दहशतवादी संघटनेचा प्रमुख सिराजुद्दीन मुख्तारोव्ह हा देखील मारला गेला. इदलिबमधल अल कायदाशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांसाठी रशियाची ही कारवाई सर्वात मोठा हादरा ठरते. पण ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने रशियाच्या या हल्ल्यात सिरियन नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप केला आहे. इदलिबमध्ये जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याची तक्रार ही संघटना करीत आहे.

हल्ल्यात 1202020 साली रशियाने सिरियातील संघर्षबंदीसाठी पुढाकार घेतला होता. अस्साद राजवटीबरोबरच सिरियातील संघर्षात सहभागी झालेल्या प्रत्येक गटाने या संघर्षबंदीचा आदर करावा, अशी सूचना रशियाने केली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून तुर्की तसेच अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनांनी सिरियातील हल्ले वाढवून संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप सिरियाकडून केला जातो. तर अमेरिकेने देखील पूर्व सिरियात तळ ठोकून इराण व इराणसंलग्न संघटनांच्या तळांवर हवाई हल्ले चढविले होते. अशा परिस्थितीत, दोन दिवसांपूर्वी रशियाने देखील सिरियातील अल कायदाच्या ठिकाणांवर हल्ले चढवून आपणही या दहशतवादविरोधी संघर्षात उतरल्याचे जाहीर केले.

पण रशियाच्या या हल्ल्यामुळे मानवाधिकार संघटनेचे माजी प्रमुख केनिथ रॉथ यांनी चिंता व्यक्त केली आहे. इदलिबमध्ये कारवाई करून रशियाने सिरियातील नव्या कारवाईचे संकेत दिल्याचा दावा रॉथ यांनी केला. रशिया सिरियातील अस्सादविरोधी गटांचा सफाया करीत असल्याचा आरोप रॉथ यांनी केला. तर रशियाने या हल्ल्यासाठी क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचा आरोप ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून रशियाचे लष्कर युक्रेनमधील युद्धात गुंतलेले होते. पण अचानक रशियाने सिरियातील अल कायदाच्या ठिकाणांवर हल्ले चढवून या क्षेत्रातून माघार घेतलेली नसल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायलकडून सिरियातील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढत असताना, रशियाने देखील येथील हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.

leave a reply