दोन दिवसात चीनच्या २३ विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

- तैवानने ‘मिसाईल सिस्टिम’च्या तैनातीसह लढाऊ विमाने धाडली

तैपेई/बीजिंग – चीनकडून तैवानविरोधात सुरू असलेल्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची तीव्रता अधिक वाढल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन दिवसात चीनच्या २३ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. चीनच्या या घुसखोरीविरोधात तैवानने ‘मिसाईल सिस्टिम’ तैनात करण्याबरोबरच लढाऊ विमानेही धाडल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये चीनच्या विमानांनी घुसखोरी करण्याची ही चौथी घटना आहे.

चिनी विमानांनी इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याची चार महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जून महिन्यात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) तब्बल २८ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर रविवारी चीनच्या तब्बल १९ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

रविवारी सकाळपासून चिनी विमानांच्या घुसखोरीला सुरुवात झाल्याची माहिती तैवानकडून देण्यात आली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात, घुसखोरी करणार्‍या विमानांमध्ये ‘शांक्सी वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’सह ‘शिआन एच-६ बॉम्बर्स’(४), ‘शेनयांग जे-१६ फायटर जेट्स’(१०) व रशियन बनावटीच्या ‘एसयु-३०’(४)चा समावेश होता, असे सांगण्यात आले आहे. त्यापूर्वी शनिवारीही चीनच्या चार विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. यात दोन ‘शांक्सी वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’ व दोन ‘जेएच-७’ लढाऊ विमानांचा समावेश होता.

गेल्या पाच दिवसात चीनच्या लढाऊ विमानांनी चार वेळा तैवानच्या हवाईहद्दीत धडका दिल्याचे समोर आले आहे. याबाबत चीनकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक देश तैवानला विविध पातळीवर समर्थन देत आहेत. काही दिवसांपूर्वीच युरोपच्या संसदीय समितीने तैवानबरोबरील संबंध बळकट करण्यासंदर्भातील ठराव मंजूर केला आहे. तर पोलंडसारख्या युरोपिय देशांकडून तैवानला कोरोना लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे चीनची राजवट बिथरली असून ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर करून तैवानवरील दडपण वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

२०१० नंतरच्या दशकात चीनने ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर सुरू केला असून, विमानांबरोबरच शेकडो सशस्त्र मच्छिमारी बोटींचा समावेश असलेल्या ‘नेव्हल मिलिशिआ’चाही वापर करण्यात येत आहे. तैवानच्या संरक्षणदलांना त्रास देऊन कायम दडपणाखाली ठेवणे व कमकुवत करणे हा त्याचा मुख्य उद्देश मानला जातो. काही दिवसांपूर्वी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तैवानी संरक्षणदलांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याकडे लक्ष वेधले वेधले होते. तैवानच्या संरक्षणदलांना पूर्ण निष्प्रभ करता येईल, अशी क्षमता चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडे असून हा धोका सातत्याने वाढत असल्याचेही बजावले होते.

leave a reply