चीनच्या 24 लढाऊ विमानांची तैवानजवळ गस्त

तैवानच्या आखातात चीनची स्टेल्थ पाणबुडी तैनात

चीनच्या ‘एक देश, दोन व्यवस्था’ धोरणावर तैवानची टीका
भारताचे तैवानच्या क्षेत्रात एकतर्फी कारवाई टाळण्याचे आवाहन

china-taiwanबीजिंग/तैपेई – चीनच्या 24 लढाऊ व बॉम्बर विमानांनी तसेच सहा गस्तीनौकांनी शुक्रवारी तैवानच्या हद्दीजवळ गस्त घातली. यामुळे सावध झालेल्या तैवानने आपल्या लष्कराला अलर्ट राहण्याची सूचना केली आहे. काही तासांपूर्वीच चीनने तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ स्टेल्थ पाणबुडी तैनात केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, तैवानची जनता आपल्या भविष्याचा निर्णय घेऊ शकतात, चीनची ‘एक देश, दोन व्यवस्था’ तैवानसाठी लागू होत नाही, अशी टीका तैवानने केली आहे. तर कोणत्याही प्रकारच्या एकतर्फी कारवाईने या क्षेत्रातील स्थिती बदलू नये, असे आवाहन भारताने केले आहे.

नॅन्सी पेलोसी अमेरिकेत पोहोचून पाच दिवस उलटले आहेत, पण अजूनही तैवानच्या आखातातील तणाव निवळलेला नाही. याउलट चीनने तैवानच्या आखातातील आपल्या युद्धसरावाची तीव्रता वाढविल्या आहेत. शुक्रवारी दुपारी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीची 24 लढाऊ व बॉम्बर विमाने आणि सहा गस्तीनौकांनी तैवानच्या हवाई तसेच सागरी हद्दीजवळून प्रवास केला. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने या कारवाईचे समर्थन केले. तर हा एक नियमित सराव असून यापुढेही असे सराव सुरू राहतील, असे चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

china-taiwan-submarineयाआधी चीनच्या नौदलातील ‘टाईप-039 युआन’ श्रेणीतील पाणबुडी तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ तैनात असल्याचा दावा केला जातो. गेल्याच महिन्यात सदर पाणबुडी चीनच्या नौदलात कार्यान्वित झाली होती. शत्रूच्या रडार यंत्रणेला गुंगारा देण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. अशी प्रगत पाणबुडी तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ तैनात करून चीनने तैवानला इशारा दिल्याचा दावा अमेरिकन माध्यमे व विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे स्टेल्थ पाणबुडीची तैनाती आणि लढाऊ विमानांची गस्त सुरू ठेवून चीनने तैवानच्या आखातातील तणाव कायम ठेवल्याचा आरोप केला जातो.

त्याचबरोबर चीनने तैवानमधील लोकशाहीवादी गटांना उघड धमकी दिली आहे. तैवानमधील लोकशाहीवादी गटांवर विघटनवादी कारवाईचा ठपका ठेवून चीनने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ‘तैवानच्या चीनमधील शांतीपूर्ण विलनीकरणाबाबत लवकरच मोठा निर्णय घेत आहे. पण नव्या चीनमध्ये विघटनवादी गटांना अजिबात स्थान नसेल. या विघटनवादी गटांविरोधात कारवाईचे सर्व पर्याय मोकळे असतील’, अशी धमकीच चीनने दिली. थेट नाव न घेता चीनने तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांना धमकावल्याचे दिसत आहे.

पण, चीनचे ‘वन कीं, टू सिस्टिम्स’ अर्थात ‘एक देश, दोन व्यवस्था’ धोरण तैवानला लागू होत नसल्याचे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले आहे. तैवानच्या भविष्याचा निर्णय चीन घेऊ शकत नाही. तैवानची जनताच स्वत:च्या व देशाच्या भविष्याचा योग्य निर्णय घेऊ शकते, असे सांगून तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला फटकारले. तर पेलोसी यांच्या यशस्वी भेटीनंतर तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इतर जागतिक नेत्यांना व शिष्टमंडळाला तैवान भेटीचे आमंत्रण दिले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून चीन व तैवानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली. तैवानच्या आखातात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आणि एकतर्फी कारवाई टाळण्यासाठी संबंधित देशांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले. यामुळे या क्षेत्रात शांती व स्थैर्य प्रस्थापित होण्यास सहाय्य होईल, असा दावा भारताने केला.

 

leave a reply