थायलंडमध्ये माथेफिरुने शाळेत केलेल्या गोळीबारात 34 जणांचा बळी

बँकॉक – थायलंडच्या नाँग बौ लंफू प्रांतातील बालवाडीत माथेफिरुन केलेल्या गोळीबारात 34 जणांचा बळी गेला. या भयंकर हल्ल्यातील बळींमध्ये छोट्या मुलांचा समावेश असल्यामुळे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पान्या कमराब असे या हल्लेखोराचे नाव असून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र कमराब अमली पदार्थांचे सेवन करीत होता, अशी माहिती उघड झाली आहे.

गुरुवारी सकाळी नाँग बौ लंफू येथील बालवाडीत बंदूक आणि चाकूसह प्रवेश केलेल्या कमराब याने बेछूट गोळीबार केला आणि त्यानंतर त्याने मोटारीतून पळ काढला. थाई पोलिसांनी हल्ल्यानंतर काही तासात कमराबच्या घरावर धाड टाकली तेव्हा कमराबने आपल्या परिवारासह आत्महत्या केल्याचे उघड झाले. या हत्याकांडामागील कारण स्पष्ट झालेले नाही. कमराब थाई पोलीस अधिकारी होता अमली पदार्थांच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर कमराबची पोलिस सेवेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

थायलंडमध्ये अशारितीने एखाद्या माथेफिरूने गोळीबार करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची फारशी उदाहरणे नाहीत. त्यामुळे गुरूवारी झालेल्या या हत्याकांडामुळे थायलंडची जनता हादरली आहे. अलीकडच्या काळात थायलंडमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगण्याचे प्र्रमाण वाढत चालले आहे. या हत्याकांडानंतर ही बाब ऐरणीवर आली आहे.

leave a reply