पुढील काही महिन्यात अमेरिकेत ‘मास शूटिंग’च्या घटना वाढतील

‘मास शूटिंग’वॉशिंग्टन – अमेरिकेत शनिवारी 24 तासांच्या अवधीत ‘मास शूटिंग’च्या चार घटना घडल्या असून त्यात पाच जणांचा बळी गेला आहे. या घटनांमध्ये जवळपास 30 जण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर, पुढील काही महिन्यांमध्ये अमेरिकेत ‘मास शूटिंग’च्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून येईल, अशी भीती पोलीस अधिकारी व विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी अमेरिकेच्या टेक्सास, जॉर्जिया, ओहिओ व इलिनॉयस प्रांतात ‘मास शूटिंग’च्या घटना समोर आल्या आहेत. ओहिओ प्रांतातील क्लेव्हलँडमध्ये करण्यात आलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेत तीनजणांचा बळी गेला असून चारजण जखमी झाले आहेत.

‘मास शूटिंग’इलिनॉयसमधील शिकागो शहरात करण्यात आलेल्या गोळीबारात एका महिलेचा बळी गेला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जॉर्जिया प्रांतातील सॅव्हाना भागात अंदाधुंद गोळीबारात एकाचा बळी गेला असून सातजण जखमी झाले आहेत. टेक्सासमधील घटनेत 14 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अवघ्या 24 तासात एकमागोमाग घडलेल्या या घटनांमुळे पोलीसदलातही प्रचंड अस्वस्थता असून, नजिकच्या काळात अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ‘देशभरात घडणार्‍या अंदाधुंद गोळीबार व हिंसाचाराच्य घटनांमुळे आम्ही अस्वस्थ झालो आहोत. या घटना संवेदना बधिर करणार्‍या आहेत’, अशी प्रतिक्रिया सॅव्हानाचे पोलीसप्रमुख रॉय मिंटर ज्यु. यांनी दिली. पुढील काळात अशा घटना वाढण्याची भीती आहे, असा दावाही त्यांनी केला. ‘पोलीस एक्झिक्युटिव्ह रिसर्च फोरम’ या अभ्यासगटाचे प्रमुख चक वेक्सलर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

‘मास शूटिंग’या वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमागे कोरोनाची साथ व ‘डिफंड पोलीस’ सारख्या मोहिमा कारणीभूत असल्याचा दावा माजी अधिकारी व विश्‍लेषकांनी केला आहे. ‘डिफंड पोलीस’ मोहीम व पोलिसांवर मोठ्या प्रमाणात होणारे आरोप यामुळे अनेक पोलिसांनी राजीनामे दिले आहेत. कोरोना साथीतही अनेक पोलिसांचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलिसदलात मनुष्यबळ कमी पडत असून, त्याचा फायदा गुन्हेगार उचलत असल्याचे मानले जाते.

शनिवारी एकापाठोपाठ एक घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर अमेरिकेत पुन्हा एकदा ‘गन कंट्रोल’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘द गन व्हायोलन्स अर्काइव्ह’ या अभ्यासगटाच्या दाव्यानुसार, गेल्या दोन वर्षात ‘मास शूटिंग’च्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. 2020 साली ‘मास शूटिंग’च्या सुमारे 600 घटनांची नोंद झाली होती. यावर्षी पहिल्या साडेपाच महिन्यात मास शूटिंगच्या 260हून अधिक घटना घडल्याचे अभ्यासगटाने म्हटले आहे.

leave a reply