जम्मू-काश्मीरमध्ये सात दहशतवादी ठार

श्रीनगर – भारतीय सुरक्षादलांनी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १२ तासात सात दहशतवाद्यांना ठार केले. सुरक्षादलांची आठवड्याभरातली ही चौथी मोठी कारवाई ठरते. तर लॉकडाऊनच्या काळात सुरक्षादलांनी एकूण २७ दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगितले जाते.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास जम्मू- काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलिसांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. अद्याप त्यांची ओळख पटली नाही. या चकमकीदरम्यान संरक्षणदलाचे एक अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.यानंतर परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली. याला काही तास उलटत नाही तोच कुलगामच्या लोअर मुंडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दुसरी चकमक सुरु झाली. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. हे सात दहशतवादी कोणत्या संघटनांचे आहेत, ते स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या वर्षांच्या सुरुवातीपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ५९ हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. यात लॉकडाऊनच्या काळात ठार झालेल्या २७ जणांचा समावेश आहे. यात ‘लश्कर- ए- तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेच्या कंमार्डसचा समावेश आहे. सुरक्षादलांच्या या आक्रमक कारवाईमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण घटले आहे. तसेच इथली स्थानिक जनताही आता सुरक्षा दलांना सहकार्य करीत असल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे.

leave a reply