इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांमध्ये 83 जणांचा बळी

- माजी राष्ट्राध्यक्ष रफ्संजानी यांच्या मुलीला अटक

83 जणांचा बळीतेहरान – गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये भडकलेल्या हिजाबविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारात 83 जणांचा बळी गेल्याची माहिती मानवाधिकार संघटनांनी दिली. पण इराणची राजवट बळींची संख्या लपवीत असून रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कारवाईत किमान तीनशे जणांची हत्या घडविण्यात आल्याचा आरोप युरोपिय देशांमध्ये वास्तव्य असलेल्या इराणच्या राजवटीविरोधातील गटांनी केला. दरम्यान, इराणमध्ये पेटलेल्या या निदर्शनांना इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अकबर हाशेमी रफ्संजानी यांची कन्या फईझ हाशेमी यांचे समर्थन दिल्यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी फईझ यांना देखील ताब्यात घेतले. तर 1979 सालच्या इस्लामी क्रांतीच्याही आधी इराणमध्ये सत्तता असलेल्या रेझा पहलवी शहा यांच्या मुलाने देखील इराणमधील राजवटीविरोधात पेटलेल्या या निदर्शनांना समर्थन दिले आहे.

माहसा अमिनी या 22 वर्षी कुर्द तरुणीने इराणमधील हिजाब सक्तीच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी तिला अटक केली. माहसाचा कारागृहातच संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर गेल्या चौदा दिवसांपासून इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या राजवटीविरोधात आंदोलन पेटले आहे. इराणमधील तरुण-तरुणींचा मोठा गट या आंदोलनात उतरला असून खामेनी राजवटीसाठी हा मोठा हादरा असल्याचा दावा केला जातो. कारण आत्तापर्यंत खामेनी यांच्या राजवटीला तरुणांचा मोठा पाठिंबा होता.

पण इराणच्या 80 हून अधिक शहरांमध्ये भडकलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व तरुणांचा गट करीत असल्यामुळे खामेनी राजवटीसमोरील आव्हाने वाढल्याचा दावा युरोपिय माध्यमे करीत आहेत. हे तरुण आंदोलनकर्ते इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स तसेच बसिज मिलिशिया या सशस्त्र गटांवर हल्ले चढवीत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण इराणची राजवट या आंदोलनात बळींची तसेच अटक झालेल्यांची खरी माहिती उघड करीत नसल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या दोन आठवड्यांच्या आंदोलनात किमान तीनशे जणांचा बळी तर 15 हजाराहून अधिक जणांना अटक झाल्याचे पॅरिसमधील ‘पिपल्स मोजाहेदीन ऑर्गनायझेशन ऑफ इरान-पीएमओआय’ या इराणी बंडखोर संघटनेने म्हटले आहे.

इराणमध्ये पेटलेल्या या तरुणांच्या आंदोलनाला राजवटविरोधी गट जाहीरपणे समर्थन देत आहेत. इराणमधील इंधन उद्योगाशी संबंधित कामगारांनी राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्याकडे आंदोलकांविरोधातील कारवाई बंद करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना या कामगारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दररोज या महिला आंदोलकांवर होणाऱ्या कारवाया बंद झाल्या नाही, तर संप पुकारण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे. अशारितीने या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली असून व्यापारी वर्ग आणि उद्योगक्षेत्रातूनही या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत आहे. ही बाब इराणच्या राजवटीसाठी धोकादायक ठरू लागली आहे.

leave a reply