उघुरांचा गुलाम कामगार म्हणून वापर करणार्‍या चिनी कंपन्यांशी संबंध ठेवणार्‍या ब्रिटीश कंपन्यांवर कारवाई होणार

- परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांची घोषणा

ब्रिटीश कंपन्यांवर कारवाईलंडन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या गळचेपीच्या घटना संतापजनक असून, त्याला प्रत्युत्तर देणे ब्रिटनचे नैतिक कर्तव्य आहे, असे सांगून झिजिआंगमधील चिनी कंपन्याशी संबंध ठेवणार्‍या ब्रिटीश कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी केली. दोन दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाच्या ‘ह्युमन राईट्स कमिशन’ने चीनमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनावर टीकेची झोड उठविणारा आक्रमक अहवाल सादर केला होता. त्यानंतर कारवाईची घोषणा करून यापुढे चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल, असे संकेत ब्रिटीश सरकारने दिले आहेत.

चीनकडून गेली काही वर्षे झिंजिआंग प्रांतातील इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा सातत्याने छळ सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची व्यापक प्रमाणात दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. ब्रिटीश कंपन्यांवर कारवाई२०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात चीनने तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला होता. या अहवालानंतर पाश्‍चिमात्य देशांनी उघुरांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी अमेरिकेसह युरोपिय देशांनी पुढाकार घेतला आहे.

ब्रिटनने आपल्या ‘मॉडर्न स्लेव्हरी अ‍ॅक्ट’मध्ये सुधारणा घडवून त्यात उघुरांसंदर्भातील तरतुदींचा समावेश केला आहे. यासंदर्भात माहिती देताना परराष्ट्रमंत्री राब यांनी ब्रिटीश कंपन्यांना निर्वाणीचा इशारा दिला. ब्रिटनमधील कंपन्यांना त्यांच्या ‘सप्लाय चेन’मध्ये उघुरांचा गुलाम कामगारांप्रमाणे वापर करणार्‍या चिनी कंपन्यांचा समावेश नसल्याचे निवेदन प्रसिद्ध करावे लागणार आहे. तसेच अशा चिनी कंपनीचा समावेश असल्यास त्याविरोधात काय पावले उचलली याचीही माहिती देणे भाग पडणार आहे. ही जबाबदारी टाळणार्‍या ब्रिटीश कंपन्यांना जबर दंड भरावा लागणार आहे.ब्रिटीश कंपन्यांवर कारवाई

झिंजिआंगमधील चिनी कंपन्यांशी संबंध नसलेल्या ब्रिटीश कंपन्यांनाच यापुढे सरकारकडून चांगली कंत्राटे दिली जातील. ब्रिटीश कंपनीकडून निर्यात होणार्‍या उत्पादनांचा वापर उघुरांच्या छावण्यांसाठी होत असल्यास अशा निर्यातीवर निर्बंध लादण्यात येतील, अशी माहिती परराष्ट्रमंत्री राब यांनी दिली. ‘झिंजिआंगमधील उघुरांच्या छळछावण्यांचा ब्रिटनमधील कंपन्यांशी संबंध असून नये, याची खात्री करून घेण्यासाठी कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. अशा छावण्यांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करून तयार झालेली उत्पादने ब्रिटनमधील बाजारपेठेत दिसणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल’, असा इशाराही ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

यावेळी परराष्ट्रमंत्री राब यांनी, चीनच्या राजवटीकडून उघुरवंशियांविरोधात सुरू असणार्‍या अत्याचारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘छळछावण्या, मनमानी पद्धतीने घडविलेला तुरुंगवास, राजकीय विचारसरणी लादण्याचे प्रयत्न, गुलाम कामगार म्हणून होणारा वापर, छळ, जबरदस्तीने करण्यात येणारी नसबंदी यासारख्या भयावह गोष्टी व्यापक स्तरावर घडत आहेत. रानटीपणाचे युग संपल्याचे मानले जात होते. मात्र आंतरराष्ट्रीय समुदायातील आघाडीच्या देशाकडून रानटी कृत्ये करण्यात येत आहेत’, अशा खरमरीत शब्दात राब यांनी चीनला फटकारले. यावेळी त्यांनी झिंजिआंगमध्ये सुरू असलेल्या मानवाधिकारांच्या गळचेपीची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेला प्रवेश मिळायलाच हवा, अशी आग्रही मागणीही पुढे केली.

leave a reply