अमेरिका व युरोपमधील ज्यूद्वेषी हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ

वॉशिंग्टन – इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष भडकल्यानंतर, गेल्या दहा दिवसांमध्ये अमेरिका आणि युरोपमधील ज्यूंवर किमान 193 वंशद्वेषी हल्ले झाले आहेत. अमेरिकेच्या प्रख्यात टाईम्स स्क्वेअर चौकापासून ते लंडनच्या रस्त्यांपर्यंत ज्यूधर्मियांना लक्ष्य करण्यात आले, अशी चिंता ‘अँटी डिफेमेशन लीग’ (एडीएल) या अमेरिकन संघटनेने व्यक्त केली. हे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने कारवाई करावी, असे आवाहन काही सिनेटर्स करीत आहेत.

इस्रायल आणि हमासमधील संघर्ष जसजसा वाढत गेला, त्याप्रमाणे जगभरातील ज्यूद्वेषी हल्ल्यांमध्ये भयावह आणि धोकादायक वाढ होत गेली. यामध्ये ज्यूधर्मियांना मारहाण, त्यांच्या मालमत्तेची तोडफोड, हिंसा आणि अत्याचाराच्या घटनांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. लंडन, पॅरिस ते अमेरिकेच्या लॉस एंजिलिस, फ्लोरिडा, न्यूयॉर्क अशा मोठ्या शहरांपासून अगदी छोट्या शहरांमध्येही असे हल्ले झाले. सोशल मीडियावरही ज्यूद्वेषी प्रचार केला गेला’, अशी माहिती एडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोनॅथन ग्रीनबेल्ट यांनी दिली.

इस्रायल-हमासमध्ये संघर्ष सुरू असताना, जगभरात ज्यूधर्मियांवर सुमारे 193 हल्ले झाल्याचे ग्रीनबेल्ट यांनी सांगितले. त्याआधी गेल्या दीड वर्षांमध्ये ज्यूधर्मियांवर 131 हल्ले झाल्याच्या नोंदी होत्या. या तुलनेत गेल्या दहा दिवसांतील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे ग्रीनबेल्ट यांनी स्पष्ट केले. यापैकी न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलिस शहरांतील हल्ले गंभीर असून त्याची चौकशी सुरू आहे. न्यूयॉर्कच्या प्रशासनाने ज्यूधर्मियांवरील हल्ल्याची निर्भत्सना केली आहे. तर लॉस एंजिलिस शहरात दोन मोटारींनी ज्यूधर्मिय तरुणाचा पाठलाग केला. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे.

‘एडीएल’ने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना ज्यूधर्मियांवरील या हल्ल्यांवर चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. याप्रकरणी एडीएलचे अधिकारी आणि अमेरिकन सिनेटमधील काही नेत्यांनी व्हाईट हाऊसला भेट दिल्याच्या बातम्याही आहेत. हिंसक हल्ल्यांबरोबर सोशल मीडियामधूनही ज्यूधर्मियांना लक्ष्य केले जात असल्याचे एडीएलने सदर पत्रात म्हटले आहे. दुसर्‍या महायुद्धात हिटलरने ज्यूंची केलेली कत्तल योग्यच होती, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर मजकूर असणारे सुमारे 17 हजार पोस्ट इस्रायल-हमासच्या संघर्षावेळी व्हायरल झाले होते, याची नोंदही एडीएलने केली.

 दरम्यान, अर्जेंटिना, कॅनडामध्ये भिंतींवर ज्यूद्वेषी मजकूर लिहून तो सोशल मीडियावर फिरविण्यात आला होता. तर गेल्या आठवड्यात लंडन येथील निदर्शनांवेळी मोटारीत बसलेल्या पॅलेस्टिनी तरुणांनी ‘जिथे ज्यू दिसतील, तिथे त्यांचा खून करा’, अशा भयंकर घोषणा दिल्या होत्या. याचीही चौकशी सुरू असून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.

leave a reply