अफगाणी लष्कराच्या कारवाईत 38 तालिबानी ठार

- गझनी तळावरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडचाही खातमा

काबुल – गझनी आणि झाबुल प्रांतात अफगाणी लष्कराचे तळ व नागरी वस्त्यांना लक्ष्य करणारे हल्ले चढविणाऱ्या तालिबानवर अफगाणी लष्कराने जोरदार कारवाई केली. यामध्ये तालिबानचे 38 दहशतवादी मारल्याचा दावा अफगाणी लष्कराने केला. त्याचबरोबर गझनीच्या लष्करी तळावरील हल्ल्याचा सूत्रधार ‘हमझा वझिरीस्तानी’ याला ठार केल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. हमझा पाकिस्तानच्या वझिरीस्तानमधील होता, अशी माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दिली.

रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली ‘हमवी’ गाडी गझनीतील लष्करी तळावर धडकवून केलेल्या प्रचंड स्फोटात लष्कराचे 31 जवान जागीच ठार झाले होते. या हल्ल्यानंतर झाबुल प्रांतातील कलात शहरातही अशाचप्रकारे स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात तिघांचा बळी गेला होता. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नव्हती. पण तालिबानचा प्रभाव असलेल्या भागात हे हल्ले झाले होते. तसेच या हल्ल्यांची पद्धत तालिबानशी मिळतीजुळती असल्याने या हल्ल्यांमागे तालिबान असल्याचा आरोप अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी केला होता.

या पार्श्‍वभूमीवर, पुढच्या काही तासात अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी लाघमान प्रांतातील दौलत शाह जिल्ह्यातील तालिबानच्या तळावरच हल्ले चढविले. या हल्ल्यात तालिबानचे 30 दहशतवादी ठार झाले असून यामध्ये सहा कमांडर्सचाही समावेश आहे. तर किमान 17 जण यात जखमी झाले आहेत. यानंतर अफगाणी लष्कराने रविवारी रात्री गझनी प्रांतातच केलेल्या कारवाईत हमझा वझिरीस्तानी याच्यासह आणखी सात दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केली. अफगाणी लष्कराची ही कारवाई तालिबानसाठी मोठा हादरा असल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये सुरू असलेली शांतीचर्चा अद्यापही पुढे सरकलेली नाही. चर्चेत आपले वर्चस्व रहावे म्हणून तालिबान हल्ल्यांच्या माध्यमातून दडपण आणत असल्याचा आरोप अफगाण सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत.

leave a reply