अफगाणी लष्कर व अमेरिकेच्या कारवाईत ७९ दहशतवादी ठार

- पाकिस्तानच्या नऊ दहशतवाद्यांचा समावेश

काबुल – अफगाणिस्तान आणि अमेरिकी लष्कराने निमरूझ प्रांतात केलेल्या चढविलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या नऊ दहशतवाद्यांसह १४ जण ठार झाले आहेत. उर्वरित पाच तालिबानी असल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दिली. अफगाणिस्तानातील अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाण सरकार व सुरक्षा यंत्रणा सातत्याने करीत आहेत. काही दिवसांपूर्वी तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानला दिलेल्या भेटीवरही अफगाणी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी ताशेरे ओढले होते. गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणी लष्कराने तालिबानविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. तालिबानने अफगाणी नेते, लष्कर आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यास सुरू केल्यानंतर, अफगाणी लष्कराने ही मोहीम छेडल्याचा दावा केला जातो. अफगाणी लष्कराच्या या दहशतवादविरोधी मोहिमेला अमेरिका देखील सहाय्य करीत आहे. अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून अफगाणी जवानांना लष्करी कारवाईसाठी संधी निर्माण करीत आहेत.

रविवारी अफगाणिस्तानच्या निमरूझ प्रांतातील खाशरोद जिल्ह्यात चढविलेल्या हवाई हल्ल्यात ९ पाकिस्तानी तर पाच तालिबानी दहशतवादी ठार झाले. या व्यतिरिक्त सहा तालिबानी देखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या हवाई हल्ल्यात अफगाणी जनतेचा बळी गेल्याची टीका सुरू आहे. पण या कारवाईत जनतेचा बळी गेला का, याचा तपास सुरू असल्याचे, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

या व्यतिरिक्त अफगाणी लष्कराने बाघलान, हेल्मंड, घझ्नी, उरूझ्गन प्रांतातही कारवाई केली आहे. या कारवाईत ६५ तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये उरूझ्गन प्रांतात सर्वाधिक ३२ दहशतवादी मारले गेले. याशिवाय हेल्मंड प्रांतातून अफगाणी लष्कराने सुमारे २०० ‘आईडी’ स्फोटके तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दहशतवाद्यांच्या विरोधातील ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर तालिबानने टीका केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने हवाई हल्ले रोखले नाही तर गंभीर परिणामांची धमकी तालिबानने दिली आहे.

leave a reply