अफगाणी जनतेचा धीर सुटत चालला आहे

-संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींचा गंभीर इशारा

धीर सुटत चाललासंयुक्त राष्ट्रसंघ – सतत सुरू असलेला संघर्ष आणि युद्ध यात होरपळणाऱ्या अफगाणिस्तानच्या जनतेचा धीर सुटत चालला आहे. या देशातील परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असून या गरीब देशातील जनता आपले सर्वस्व गमावत आहे. पोट भरण्यासाठी अफगाणींना आपल्या अवयवांची आणि मुलाबाळांचीही विक्री करावी लागत आहे, असा हादरवून टाकणारा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे अफगाणिस्तानविषयक विशेष उपप्रतिनिधी रमीझ अलबरो यांनी दिला आहे.

संघर्ष, युद्ध यांच्याबरोबरच गेल्या चार वर्षातील दोन वर्ष अफगाणिस्तानला दुष्काळ सहन करावा लागला. यामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती चिघळली असून जनतेला आपली उरलीसुरली बचत देखील या काळात खर्च करावी लागली. गरीबांची अवस्था इतकी बिकट बनली आहे की त्यांना आपले अवयव विकून किंवा आपल्या मुलाबाळांची विक्री करून पोट भरावे लागत आहे. जवळपास अडीच कोटी अफगाणींना मानवी सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. २०१६ साली ही संख्या दोन कोटी इतकी होती, अशी माहिती रमीझ अलबरो यांनी दिली.

२०२२ सालच्या जून महिन्यात अफगाणितस्तानात ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यात हजार अफगाणींचा बळी गेला आणि दीड हजार जखमी झाले होते. तर पावसामुळे आलेल्या पूरात ९५ अफगाणी बळी गेले होते व हजारो जणांची घरे यात वाहून गेली होती. यामुळे युद्ध आणि रक्तपाताबरोबरच नैसर्गिक प्रकोपाचाही सामना अफगाणी जनतेला करावा लागत आहे. याने इथली परिस्थिती अधिकाधिक भयावह बनत चालली आहे. त्यातच अशा संकटांना तोंड देण्याची क्षमता सध्याच्या तालिबानने स्थापन केलेल्या राजवटीकडे नाही. या राजवटीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अफगाणी जनतेला मिळणाऱ्या सहाय्यावरही खूप मोठी मर्यादा येत आहे.

यामुळे अफगाणिस्तानात भयंकर आपत्ती कोसळली असून पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळाले नाही, तर अफगाणिस्तानात मोठ्या संख्येने बळी जातील, असे इशारे संयुक्त राष्ट्रसंघाकडून सातत्याने दिले जात आहेत. मात्र अजूनही आंतरराष्ट्रीय समुदायाचा तालिबानवर विश्वास नसून तालिबानने देखील आपल्या कट्टरवादी धोरणात बदल घडवून आणलेले नाहीत. तालिबानमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या मुद्यावर एकवाक्यता नसून हे अंतर्गत मतभेद तालिबानच्या राजवटीसाठी फार मोठे आव्हान बनून खडे ठाकले आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानात आयएससारख्या दहशतवादी संघटना डोके वर काढत आहेत. लवकरच अफगाणिस्तानात इतर दहशतवादी संघटनांचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्याच एका अहवालात नमूद करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, रमीझ अलबरो यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेला इशारा अत्यंत गंभीर बाब ठरत असून अफगाणिस्तानच्या शेजारी देशांसह त्याच्या पलिकडील क्षेत्रातही या देशातील उलथापालथीचे गंभीर परिणाम होऊ शकतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply