पाकिस्तानविरोधी दहशतवादासाठी अफगाणिस्तानचा वापर होत आहे

- पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ

मोईद युसूफइस्लामाबाद – अफगाणिस्तानातील दहशतवादाचा वापर आजही पाकिस्तान विरोधात होत आहे. दहशतवादी संघटना आजही अफगाणिस्तानात तितक्याच सक्रिय आहेत, असा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी केला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात लष्करी चौकीवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे दहा जवान मारले गेले होते. यासाठी सीमेपलीकडील दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानची यंत्रणा करत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अफगाणिस्तानातील दहशतवाद अजूनही सक्रिय असल्याचे सांगून थेट तालिबानवर आरोप केल्याचे दिसतेे.

दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तानच्या केच भागात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षा चौकीवर हल्ला चढवला. पाकिस्तानच्या यंत्रणांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले आहे. पण पाकिस्तानची माध्यमे ही माहिती जनतेसमोर घेऊन येत आहेत. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे किमान आठ ते दहा जवान मारले गेल्याचे या माध्यमांच म्हणणे आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. आत्तापर्यंत दोन ते चार जवान मारले जात होते. पण एवढ्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी जवानांा बळी जाण्याची ही पहिलीच घटना ठरते, असे माध्यमांचे म्हणणे आहे. या हल्ल्यामागे बलोचिस्तानातील बंडखोर संघटना जबाबदार असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. त्याचवेळी या हल्ल्यात १० नाही तर ५० हून अधिक जवान मारले गेल्याची शक्यताही वर्तविली जाते.

अशा परिस्थितीत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी पाकिस्तानच्या संसदीय समितीला माहिती देताना, आपल्या देशातील दहशतवादी हल्ल्याचे खापर अफगाणिस्तानवर फोडले. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबाबत पाकिस्तानचे सरकार पूर्णपणे आशावादी नाही, असे लक्षवेधी विधान युसूफ यांनी केले. तर काही महिन्यांपूर्वी झालेली संघर्षबंदी तहरीक-ए-तालिबानमुळेच मोडली, असा आरोप युसूफ यांनी केला. पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारणार्‍या प्रत्येकाचा पोलादी निर्धाराने मुकाबला केला जाईल, असा इशारा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला. थेट उल्लेख केला नसला तरी, तहरीक-ए-तालिबान च्या नेत्यांना आश्रय देणार्‍या अफगाणिस्तानातील तालिबानला देखील पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इशारा दिल्याचे दिसत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून ड्युरंड लाईनवर अफगाण तालिबान आणि पाकिस्तानच्या लष्करात चकमकी झडत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील जनतेला विभागणारी ही सीमा आपल्याला मान्य नसल्याचे तालिबानने जाहीर केले आहे. नांगरहार, कुनार आणि निमरोज या भागांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराने उभारलेले काटेरी कुंपण तालिबानने उखडून टाकले होते. काही ठिकाणी तालिबान आणि पाकिस्तानी लष्करामध्ये गोळीबार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानातील पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार बेकायदा असून लवकरच पाकिस्तानातही सत्ता बदल घडविण्याची धमकी तालिबानच्या काही नेत्यांनी दिली होती.

मोईद युसूफयावर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तानचा दोन दिवसाचा विशेष दौरा करणार होते. पण ऐनवेळी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा हा अफगाणिस्तान दौरा रद्द करण्यात आला. अफगाणिस्तानातील खराब हवामानामुळे हा दौरा रद्द केल्याचे पाकिस्तानी यंत्रणांनी जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात वेगळ्याच कारणामुळे हा दौरा रद्द करावा लागल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या दौर्‍याच्या आधीच अफगाणिस्तानमध्ये त्याविरोधात तीव्र निदर्शने सुरू झाली होती. त्याची तीव्रता लक्षात घेऊन युसूफ यांना हा दौरा रद्द करावा लागला. अन्यथा या निदर्शनांमुळे अफगाणी समाजातील पाकिस्तानच्या विरोधातील असंतोष जगासमोर अधिक ठळकपणे आला असता, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. तर पाकिस्तानचे काही पत्रकार अफगाणिस्तानातील या निदर्शनांमागे तालिबानचाच हात असावा, असे आरोप करीत आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर जल्लोष करणार्‍या पाकिस्तानला तालिबान हेच आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान वाटू लागले आहे. या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केलेली विधाने याची साक्ष देत आहेत.

leave a reply